(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Raut | मला चांगली राहणीमान आवडते, माणसाने लॅविश राहू नये का? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं विरोधकांना प्रत्युत्तर
राज्यात महावितरणकडून वीजबिल थकीत करणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचं सरकारी निवासस्थान आणि कार्यालयाच्या पुनर्बांधणीवर कोट्यवधींचा खर्च केला जातोय असा आरोप भाजपने केला होता.
मुंबई : मला चांगले रहायला आवडते, माणसाने लॅविश राहू नये का असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांना केलाय. मी कोणतेही नियमबाह्य काम केलं नसून गेले वर्षभर मी भाड्याच्या घरी राहत होतो असंही ते म्हणाले. राज्यात सामान्यांच्या घरची वीज तोडली जात असताना ऊर्जामंत्र्यांच्या आलिशान घरावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे असा आरोप भाजपने केला होता.
पैसे थकीत राहिल्याने शेतकऱ्यांची वीज तोडता मग मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधीचा खर्च कशासाठी करता असा प्रश्न उपस्थित करत भाजपने राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. राज्यात महावितरणकडून वीजबिल थकीत करणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी निवासस्थान आणि कार्यालयाच्या पुनर्बांधणीवर कोट्यवधींचा खर्च केला जातोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही भाजपने केली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, "पर्णकुटी बंगला अजून ही वाईट अवस्थेत आहे, त्याचे काम सुरू आहे. गेले एक वर्ष झाले तरी शासकीय निवासस्थान मिळालं नाही. कोरोना काळात शासकीय निवासस्थान मिळालं नसल्यानं भाड्याच्या घरात राहिलो. तेव्हा म्हटलं एक किंवा दोन रूम तरी तयार करुन द्या. आता घर मिळालं असलं तरी त्यामध्ये अजून काम सुरू आहे."
शेतकऱ्यांची वीज तोडता मग ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च कशासाठी : भाजप
माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही असं सांगत नितीन राऊत म्हणाले की, "सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचं ते समजावं. माझं किचन बघा हे लॅविश आहे का? माणसाने लॅविश राहू नये का? लोकांना वाटतं मी ऊर्जा खात्यात काम करतो, ते लोकांना सलत आहे त्यामुळे त्यांना तिरस्कार वाटतो, त्यांच्या पोटात जळत आहे."
फोटोत दिसत असलेला टीव्ही मी माझ्या खर्चाने आणला आहे. माझ्या आधीच्या घरी मोठा टीव्ही होता. तुम्ही इतर मंत्र्यांचे बंगले पाहिले तर ते देखील तसेच आहेत असंही नितीन राऊत म्हणाले.
मी वेगळं काही केलं नाही असं सांगत ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, "भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या घरात काय खर्च केला हे त्यांनी पाहावं. हे जर बाहेर आलं तर वाद होईल. मला कोणतेही आरोप करायचे नाहीत, मी जे काही केलं ते नियमानुसार केलं."
नितीन राऊत म्हणाले की, "मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो. सगळेजण आमच्यावर टीका करतात, आम्ही काही काम करू शकत नाही असा आरोप करतात. आरोप करणाऱ्या बातम्या कोण चालवतं हे बघितलं पाहिजे. नुसतं बातम्या चालवल्याने काही होत नाही, बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझं खात काढणार नाही. ते माझ्याकडे राहणार आहे."