Elgar Parishad | पुण्यात आज एल्गार परिषदेचं आयोजन, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
तीन वर्षापूर्वी पुण्यात झालेली एल्गार परिषद (Elgar Parishad) वादग्रस्त ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या परिषदेवर पोलिसांची करडी नजर असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Elgar Parishad: पुण्यात आज एल्लार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील श्री गणेश क्रीडा कला मंचांवर ही परिषद होणार आहे. या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण जर परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावर या परिषदेचं आयोजन करण्यात येईल असा इशारा निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली होती.
या आधी झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे आजच्या होणाऱ्या या एल्गार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या आधी 31 डिसेंबरला ही परिषद घेण्यास परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांनी 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिषदेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. साध्या वेशातील पोलिसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.
तीन वर्षांपूर्वी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या एल्गार परिषदेसाठी मोठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. केवळ 200 लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार आहे. त्यामध्ये कोणतंही मोठं राजकीय नाव नाही. दिवसभर होणाऱ्या या परिषदेमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम आणि पोवाड्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलं आहे.
Elgar Parishad | एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी; 30 जानेवारीला पुण्यात आयोजन
निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेच्या आयोजनाच्या परवानगीसाठी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यावेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती. त्यामुळे कोळसे पाटलांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. पण अखेर पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. परंतु, या परिषदेसाठी अटी-शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ 200 व्यक्तींनाच पुणे पोलिसांकडून या परिषदेसाठी परवानी देण्यात आली आहे. त्याचसोबत कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी आयोजकांना घ्यावी लागणार आहे, अशी अटही पुणे पोलिसांना घातली आहे.
यापूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, 1 जानेवारी 2018 या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी एल्गार परिषदेचा संबंध कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराशी जोडला होता. याप्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. तसेच देशभरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत याप्रकरणी अद्यापही तुरुंगात आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी या परिषदेला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. परंतु, आता 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पहा व्हिडीओ: Elgar Parishad | पुण्यात आज एल्गार परिषदेचं आयोजन