Maharashtra Politics : राष्ट्रवादीचीही आता चिन्हाची लढाई सुरु होणार? अजित पवारांच्या दाव्याबाबत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस
Maharashtra Politics : अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे.
![Maharashtra Politics : राष्ट्रवादीचीही आता चिन्हाची लढाई सुरु होणार? अजित पवारांच्या दाव्याबाबत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस Election Commission notice to Sharad Pawar group regarding Ajit Pawar s claim on party detail marathi news Maharashtra Politics : राष्ट्रवादीचीही आता चिन्हाची लढाई सुरु होणार? अजित पवारांच्या दाव्याबाबत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/1e199611185e97e672ef61edde9146531688314304667265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या (NCP) फुटीनंतर निवडणूक आयोगात (Election Commission) फारशी हालचाल होत नाही, अशी चर्चा असतानाच याबाबत अखेर निवडणूक आयोगाचं पहिलं पाऊल पडलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटानं पक्षावर केलेल्या दाव्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपणच आहोत हा दावा अजित पवारांनी केला आहे, त्याबाबत आपलं उत्तर द्या असं आयोगानं या नोटीशीत म्हटलं आहे. त्यासाठी 3 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचीही आता चिन्हाची लढाई सुरु होणार?
2 जुलै रोजी, राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपध घेतली. त्यानंतर 5 जुलै रोजी अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करण्यात आली होती. 30 जून रोजीच पक्षाच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. 40 आमदारांच्या सह्यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचाही दावा करण्यात आला होता. आता या सगळ्याबाबत शरद पवार गटाचं नेमकं आयोगासमोर म्हणणं काय आहे, हे त्यांना कळवावं लागणार आहे.
शरद पवारांना निवडणूक आयोगाची नोटीस
खरंतर, ज्या दिवशी अजित पवार गटानं निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करण्यात आली, त्याच्या आधीच 3 जुलै रोजी शरद पवार गटानं निवडणूक आयोगात कॅव्हिएटही दाखल केलं होतं. पण त्यानंतर गेले काही दिवस कुठलीही पुढची नोटीस निवडणूक आयोगाकडून येत नव्हती. एखाद्या पक्षावर दोन गटांनी दावा केल्यानंतर तातडीनं निवडणूक आयोगानं त्याबाबत नोटीस बजावून उत्तर मागवणं अपेक्षित असतं. पण, आता 20 दिवसांनी ही नोटीस शरद पवार गटाला पाठवली गेली आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, देवदत्त कामत हे कायदेशीर बाजू सांभाळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगात आता शिवसेनेपाठापोठ राष्ट्रवादीच्या चिन्हासाठीची लढाई लवकरच सुरु होण्याची चिन्हं दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यामुळे आता अजित पवारांच्या बाबतीत निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतं, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण, आता शरद पवारांकडून या नोटीशीला काय उत्तर येणार, याची देखील उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या या राजकीय घडामोडींना आता कोणतं नवं वळण मिळणार, हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या उत्तराकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिल्याचं म्हटलं जात आहे.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)