Eknath Shinde : घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून NDRF आणि इतर अटीशर्ती बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई : मला फक्त बाळासाहेब ब्रँड माहिती आहे, इतर कोणताही ब्रँड माहिती नाही, महापालिका निवडणुकीत महायुतीलाच यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. कधी घराचा उंबरठा न ओलंडणारे आता हंबरडा (Uddhav Thackeray Hambarda Morcha) फोडत आहेत. जेव्हा द्यायची वेळ होती तेव्हा आमचे हात रिकामे आहेत-रिकामे आहेत असंच यांचं सुरू होतं असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, या वेळेस कोणी राजकारण करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चावर जोरदार टीका केली.
Eknath Shinde On Marathwada Flood : शेतकऱ्यांना भरीव मदत केली
उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधा-बांधावर आम्ही जाऊन आलो. प्रत्यक्ष जाऊन तिथली परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिले आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहायचं. म्हणून आम्ही एनडीआरएफचे निकष असतील, अटीशर्ती असतील त्या सर्व बाजूला ठेऊन मोठ्या प्रमाणात भरीव देण्याचं ठरवलं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलं याच मला समाधान आहे.
आम्ही 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, आम्ही म्हणालो होतो की, शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊन देणार नाही, दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. आम्ही 47 हजार हेक्टरी मदत केली, जमीन खरडून गेलेल्या लोकांना पुन्हा मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये हेक्टरी असे 3 लाख 47 हजार रुपये मदत केली. आतापर्यंतच्या इतिहासात इतकी मदत शेतकऱ्याला कधीच मिळाली नव्हती.
Eknath Shinde PC Today : शेतकऱ्यांची दिवाळी चांगली केली
शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली. हे करत आहेत ते निव्वळ राजकारण आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना शेतकऱ्याच्या पोराच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याच्या हातात बिस्कीटचा पुडा तरी ठेवला का? आम्ही मोठं मोठे किट पाठवले, त्यांचा दसरा चांगला झाला, दिवाळी ही त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलं. हा कसला हंबरडा मोर्चा? हे उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे, हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेले राजकारण आहे.























