2 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ निर्णयाला घटनात्मक वैधता नाही; राज्यपाल, हे काय सुरू आहे ? - संजय राऊत
Eknath shinde And Devendra fadnavis : भारतीय घटनेनुसार 12 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असणं बंधनकारक असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Eknath shinde And Devendra fadnavis : भारतीय घटनेनुसार 12 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असणं बंधनकारक असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन मंत्र्ययांच्या मंत्रिमंडळाला घटनात्मक वैधता नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडले आहे. राज्यपाल हे काय सुरु आहे? असा सवालही संजय राऊत यांनी केलाय.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीला दोन आठवडे उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी भारतीय घटनेचा हवाला देत मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय वैध नसल्याचे म्हटले आहे.
संजय राऊतांचं ट्वीट -
भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही.
राज्यपाल, हे काय सुरू आहे ?
Art 164(1-A) of Indian Constitution says tht the number of Ministers,including CM in a State shal not be less thn 12. For last 2 weeks,cabinet consisting of just 2 Ministers in Mah'stra is taking decisions that are not constitutionally valid.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 16, 2022
Hon Governor Sir,What's going on? pic.twitter.com/0lgmkFuXvR
डॉ. अनंत कळसे काय म्हणाले?
फक्त दोनचं मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेलेल्या निर्णयाला घटनात्मक वैधता नसल्याचे विधीमंडळाचे माजी सचिव डॉ. अनंत कळसे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. मंत्रिमंडळात कमीत कमी 12 सदस्य असायला हवेत. याप्रकरणी न्यायलायतही जाता येऊ शकते, असेही कळसे म्हणाले.
20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार -
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. त्यानंतर एकदिवसाच्या गॅपनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 20 जुलै रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील पाच ते सहा मंत्र्यांना तर भाजपच्या सहा ते सात मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशाननंतर मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 19 जुलैपर्यंत दिल्लीमधून सर्व बोलणी होतील. त्यानंतर 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळलं -
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 15 आमदारांचा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटामध्ये विभागली आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 शिवसेना आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.