एक्स्प्लोर
सुरेश जैनांच्या वापसीनंतर खडसे विरोधकांचे ध्रुवीकरण सुरु
जळगाव : जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्याच्या खटल्यातील संशयित आरोपी तथा अलिकडे जामिनावर कारागृहाबाहेर आलेले माजी आमदार सुरेश जैन यांच्या घर वापसीनंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातील विरोधकांचे ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पाचोरा येथे काल (दि. १३) ऑक्टोबरला आमदार किशोर पाटील यांच्या कार्याची पुस्तिका प्रकाशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येऊन गेले. या निमित्ताने सुरेश जैन पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत स्वतः ठाकरे यांनी दिले. जळगाव विमानतळ ते पाचोरा कार्यक्रम स्थळ प्रवासादरम्यान ठाकरेंच्या सोबत त्यांच्या वाहनात जैन होते. शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेही जैन, ठाकरे चर्चेत सहभागी होते.
जैन हे कारागृहातून जळगावी परतल्यानंतर त्यांच्या बंगल्यावर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि जळगावचे महापौर नितीन लढ्ढा यांची गुफ्तगू झाली होती. यापैकी महाजन हे जरी भाजपचे मंत्री असले तरी जळगाव शहर व जिल्हा भाजपतील बरीच मंडळी त्यांच्यापासून लांबच आहेत. शहर व जिल्हा भाजपवर आजही खडसेंचेच वर्चस्व आहे. कथित आरोपांच्या वावटळीत खडसेंचे मंत्रीपद जाण्यामागे महाजन यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे बहुतांश खडसे समर्थकांचे म्हणणे आहे. याच्याशी संबंध असलेला आरोप आरटीआय कार्यकर्ता ॲड. केतन तिरोडकर यांनी पूर्वीच मुंबईत केला आहे.
महाजन हे जळगाव भाजप अंतर्गत सध्या एकाकी दिसत आहेत. जिल्हा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकतीच जिल्हा विकास व नियोजन समितीची सभा घेतली. या सभेला महाजन गैरहजर होते. यापूर्वी खडसे जेव्हा पालकमंत्री म्हणून सभा घेत तेव्हाही महाजन अशा बैठकांपासून लांब राहत. महाजन यांची ही भूमिका आजही पक्षांतर्गत खडसे विरोधी समजली जाते. महाजन यांनी आपले मंत्रालयातील वर्चस्व दाखवायला मुख्यमंत्र्यांचा जामनेर दौरा आयोजित केला आहे. खडसेंचे या दौऱ्यात काय स्थान असेल? हे वेळेवर समजेल.
जळगाव महानगर पालिकेत सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. तेथील महापौर नितीन लढ्ढा हे जैनांचे खंदे समर्थक आहेत. उपमहापौर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ललित कोल्हे असून त्यांचा व खडसेंचा खटका रेमंड कंपनीतील कामगार संघटनेच्या वर्चस्वातून उडाला आहे. मंत्री महाजन, लढ्ढा व कोल्हे हे त्रिकूट पूर्वीपासून एकत्र आहे. महाजन यांनी आयोजित केलेल्या आरोग्य महाअभियानात हे त्रिकूट मुख्यमंत्र्यासोबत व्यासपिठावर होते. त्या व्यासपिठावर खडसे कुटुंबिय खासदार श्रीमती रक्षा खडसे व जळगाव जिल्हा बँक अध्यक्षा सौ. रोहिणी खडसे यांना नावासाठी जागा होती.
महाजन, लढ्ढा, कोल्हे यांच्या सख्य वाढविण्यात आता सुरेश जैन व राज्यमंत्री गुलाबराव यांची भर पडाली आहे. जैन यांनी कोल्हे आयोजित रावण दहन कार्यक्रमात सहभागी होवून राजकीय व्यासपिठावर प्रवेशाचा पहिला अंक रंगवला. नंतर दुसरा रंग पाचोरा येथे उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत रंगला. या दोन्ही अंकात हळूहळू खडसे विरोधकांचे ध्रुविकरण होत असल्याचे दिसत आहे. ठाकरे यांच्या स्वागताला जळगाव विमानतळावर भुसावळचे संतोष चौधरीही हजर होते. ते सुध्दा खडसे विरोधकच आहेत मात्र त्यांनी जैन यांच्याशी जुळवून घेतले का? हे समजलेले नाही.
जिल्ह्यात आगामी काळात काही नगर पालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यात शिवसेना स्वबळावर व चिन्हावर लढणार असे राज्यमंत्री गुलाबराव यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील काही पालिकांमध्ये आजही जैन यांना मानणारे समर्थक आहेत. खडसे विरोधातील हे ध्रुविकरण विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जळगावच्या जागेकडे पाहून व भविष्यातील काही आखाडे बांधून तर नाही ना ? असा प्रश्न पडतो. बहुधा अशा वाटेवरून जैनांची विधीमंडळात वापसी शक्य आहे. हा अगदीच प्राथमिक अंदाज आहे.
दुसरीकडे खडसे व त्यांच्या समर्थकांनी संयम ठेवत चुप्पी साधली आहे. उच्च न्यायालयाने भोसरी भूखंड प्रकरणात चौकशीचा आदेश दिल्यामुळे खडसे मौन झाले आहेत. एखाद दुसऱ्या कार्यक्रमात बोलताना ते मंत्रिपद गेल्याबद्दल भाजपतील अंतर्गत विरोधकांवर टीका करतात. पण ती अलिकडे सौम्य झाली आहे. खडसेंच्यानंतर जळगावचे पालकमंत्रीपद महाजन यांना न देता फुंडकरांना दिल्याने खडसेंच्या मंत्रीपदी वापसीच्या आशा पल्लवित आहेतच.
जिल्ह्यात शिवसेनेतील राजकारणाची गंमत आहे. राज्यमंत्री गुलाबराव हे कट्टर खडसे विरोधक समजले जातात. मुक्ताईनगर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवशी गुलाबरावांनी भाषणात तुफान फटकेबाजी करून खडसेंना टोमणे हाणले. मुक्ताईनगर हे खडसेंचे गाव आहे. उध्दव ठाकरे हे सुरेश जैन व गुलाबराव यांच्या राजकीय बंदुकीत संघर्षाचा दारुगोळा भरत असताना शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे हे खडसेंसोबत सहकारात सत्तेची पदे चाखत आहेत. त्यामुळे आगामी काळातील संघर्षात भाजप किंवा शिवसेनेत कोण बिभिषण ठरतो व कोण विदूर किंवा शकुनी ठरतो? हे पाहणे रंजक ठरेल. जैनांच्या राजकीय सक्रियतेचा तिसरा अंक काय लिहीला जातो याकडे आता लक्ष लागले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement