खाद्यतेलांच्या दराने 11 वर्षातील उच्चांकी किंमत गाठली, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय. आता खाद्यतेलाच्या किंमतीत गेल्या 11 वर्षातील सर्वाधिक वाढ झाली आहे.
औरंगाबाद : कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात महागाईमुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय. आता खाद्यतेलाच्या किंमतीत गेल्या 11 वर्षातील सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खाद्यतेल 20 ते 50 टक्क्याने वाढले आहे
खाद्यतेलाच्या किमतीत 11 महिन्यात झालेली वाढ
- मागील वर्षी मे महिन्यात सोयाबीन तेलाच्या एका लिटरला 90 रुपये द्यावे लागत होते तर आता 156-58 रुपये किलो द्यावं लागतयात.
- सूर्यफूल तेल मागच्या वर्षी 90 रुपये किलोने मिळायचे आता तेच तेल 180 रूपये लिटर मिळतंय.
- करडी 160 -70 रुपये लिटर होते तर आता 200 ते 220 रुपये लिटर आहे.
- शेंगदाणा तेल 140-170 रुपये लिटर मागच्या वर्षी मिळायचे आता 180-90 रूपये मोजावे लागतात.
खाद्य तेलाचे भाव का वाढले?
देशाची खाद्यतेलाची साठ टक्के मागणी ही आयातीतून भागवली जाते. त्यामुळे देशांतर्गत तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय दरावर ठरत असतात. कच्च्या पाम तेलाची किंमत मलेशियाच्या बाजारात 25 मे रोजी टनाला 3890 रिंगीट होती. ती वर्षापूर्वी 2281 रिंगीट होती. सीबीओटीमध्ये सोयाबीन तेलाची किंमत 24 मे रोजी टनाला 559.51अमेरिकी डॉलर होती. गेल्या वर्षीच्या याच काळात ही किंमत 306. 16 डॉलर होती.
वाढलेल्या भावामुळे खाद्य तेलाचीही पसंतीही आता घराघरात बदलत आहे. शिवाय मागणीतही घट झालीय, आता सर्वसामान्यांच्या हातात तितकंच राहिलंय. मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यात तेलबियांचे प्रमाण अधिक होते. आता तेलबियांच्या किमतीत अधिक वाढ झाली आहे, आता ही वाढ किमान वर्षभर तरी राहिल अशी शक्यता आहे.