ED Summons Sanjay Raut : ईडीकडून चौकशीसाठी समन्स; संजय राऊत आज अनुपस्थित राहण्याची शक्यता
ED Summons Sanjay Raut : मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. मात्र, आज राऊत चौकशीसाठी अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ED Summons Sanjay Raut : राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले असताना दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांची चौकशी सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मात्र, संजय राऊत आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे राऊत आज चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
संजय राऊतांचे आव्हान
ईडी समन्सनंतर संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत म्हटलंय की, "मला आताचा समजलं ED नं मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र!" धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी हे ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे.
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे जाणून घेऊया. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
दरम्यान, ईडीकडून मागील काही दिवसांपासून भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी करण्यात आली. राहुल गांधी यांची पाच दिवस 50 तास ईडीने चौकशी केली. तर, याच प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात आले आहे. सोनिया यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ईडीकडून सोनिया यांची पुढील महिन्यात चौकशी होणार आहे. त्याशिवाय, मागील आठवड्यात शिवसेना नेते अनिल परब यांचीदेखील चार दिवस ईडीने चौकशी केली. दापोली रिसॉर्ट प्रकरणी ही चौकशी झाली होती.