(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, ED च्या आरोपपत्रात संशयीत आरोपी म्हणून देशमुखांसह दोन्ही मुलांची नावे
ईडीने मुंबईतील पीएमएलए न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या 7 हजार पानांच्या पुरवणी आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे मुख्य संशयित आरोपी म्हणून नाव निश्चित केले आहे.
Anil Deshmukh on ED Case : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण, सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने (ED) मुंबईतील पीएमएलए न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या 7 हजार पानांच्या पुरवणी आरोपपत्रात देशमुख यांचे मुख्य संशयित आरोपी म्हणून नाव निश्चित केले आहे. त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्या दोन्ही मुलांचीसुद्धा आरोपपत्रात नावे सामाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने 21 एप्रिलला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने त्यांची चौकशी सुरू केली होती. महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना देशमुख यांनी तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यामार्फत मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून 4.70 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. 100 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी राज्य नियुक्त चौकशी आयोगाला माजी गृहमंत्र्यांनी कोणतीही आर्थिक मागणी केलेली नाही किंवा मुंबईतील बारमालकांकडून किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांकडून पैसे घेतलेले नाहीत, असे सांगितल्यानंतर काही तासांतच देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांचा सक्रिय सहभागी असून वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. असा आरोप सक्त अमंलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) (ED) वतीनं विशेष न्यायालयात करण्यात आला होता. मनी लॉन्ड्रिंगचा पैसा हा विविध कंपन्यांना दान म्हणून दाखविण्यात त्यांनी देशमुख यांना मार्गदर्शन केलं आहे, असा गंभीर आरोप यामध्ये केलेला होता. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून तब्बल अकरा कंपन्या चालविल्या जातात, असं प्राथमिक चौकशीमध्ये उघड झालेलं आहे. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये ऋषिकेश संचालक किंवा भागधारक आहे. या कंपन्यांचा व्यवहार संशयास्पद आहे, असा दावा ईडीने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या: