(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल! कोकणातील समुद्र किनाऱ्यांसह पालघरच्या केळवे येथे पर्यटकांची गर्दी
Konkan Palghar : कोकणातील समुद्र किनाऱ्यांसह पालघरच्या केळवे पर्यटनस्थळी पर्यटकांनी गर्दी केली आहे. मौज मज्जा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत.
मुंबई : दिवाळी आणि त्यानंतर शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे (Holidays) पर्यटनस्थळे (Tourist Places) हाऊसफुल्ल झाली आहेत. कोकणातील समुद्र किनाऱ्यांसह पालघरच्या केळवे पर्यटनस्थळी पर्यटकांनी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे मौज मज्जा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मालवण जेटी, चिवला समुद्र किनारा, रॉक गार्डन, तारकर्ली, देवबागसह सिंधुदुर्गमधील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. जलक्रीडा पर्यटनाचाही पर्यटक आनंद लुटत आहेत. मात्र पर्यटकांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
कोकणच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची रीघ कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आहे. येवा कोकण आपलाच आसा याचा प्रत्येय कोकणात येणाऱ्या पर्यटकांना येत आहे. तशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यासोबत सुरक्षित पर्यटन देखील त्यांनी अनुभवलं. त्यामुळे आपल्या कोकणाला आपणच नीटनेटकेपणा ठेवावे यासाठी पर्यटकांनी सहकार्य केले पाहिजे असं पर्यटकांना वाटतं.
कोरोना काळाच्या आधी आणि आता दिवाळीत किंवा सलगच्या सुट्ट्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटेल बुकिंगमध्ये खूप फरक आहे. याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटेल बुकिंग 15 दिवस असायचं. मात्र यावर्षी मात्र सलगच्या सुट्या असल्या तरीदेखील तीन दिवसांचं बुकिंग फुल आहे. दिवाळी, सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं आगमन आणि मे महिना हा पर्यटनाचा हंगाम असतो. या काळात मोठ्या संख्येने पर्यटक असतात. जवळपास जिल्ह्यात या सलगच्या सुटयांमुळे सगळीच हॉटेल फुल आहेत. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याचा मनस्ताप पर्यटकांना होत आहे.
कोकणातील समुद्र किनारे, गणपतीपुळे अशा ठिकाणांना पर्यटकांची पसंती आहे. त्यामुळे सलगच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नियोजन करत पर्यटक फिरत आहेत. यात समुद्र किनारे, किल्ले, मंदिर अशा ठिकाणी पर्यटकांचा ओघ आहे. त्यामुळे कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले आहेत.
पालघरच्या केळवे पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी
कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या पालघर मधील पर्यटन व्यवसायाला आता काही प्रमाणात सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. सध्या सुरू असलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातच आलेला वीकेंड यामुळे पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे
मुंबई, ठाणे, नाशिक या महानगरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे पर्यटन स्थळावर सध्या पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातच आलेला वीकेंड यामुळे पालघर मधील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. केळवे पर्यटन स्थळी असलेला उथळ, सपाट समुद्रकिनारा आणि याच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल घनदाट जंगल यामुळे येथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालतोय. गोवा, अलिबाग ही पर्यटन स्थळं काही प्रमाणात लांब आणि महागडी पडत असल्याने मुंबई, ठाणे, नाशिक येथील पर्यटक सध्या पालघर मधील पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत. त्यामुळे आपला सुट्टीचा फार वेळ प्रवासात न घालवता मुंबई, ठाणे, नाशिकसह परिसरातील पर्यटक केळवे समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करू लागले आहेत.
मागील दोन वर्षे कोरोनाचं सावट असल्याने याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर झालेला होता. मात्र सध्या काही प्रमाणात हे निर्बंध उठल्याने पर्यटक पालघर मधील पर्यटन स्थळांवर आपल्या कुटुंबासह मज्जा मस्तीसाठी येत आहेत. त्यामुळे कोरोना काळात डबघाईला गेलेले पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसाय यांना काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या आवडीनिवडीप्रमाणे येथील पर्यटन व्यवसायिक सध्या खाद्यपदार्थांसह खेळ आणि समुद्रकिनाऱ्यावरील बाईक रायडिंगच्या मागण्यांची ही काळजी घेत आहेत. सध्या या व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले असले तरी येथील पर्यटनाला आणखीन चालना मिळावी म्हणून सरकारने पुढाकार घेण्याची गरज असल्याच येथील व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक या महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालघर जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत. मात्र या सर्व पर्यटन स्थळांचा हवा तितका विकास झालेला नाही. त्यामुळे या भागात आजही दारिद्र्य पाहायला मिळतंय. सरकारने यात लक्ष घालून येथील पर्यटनाला योग्य चालना दिल्यास पालघर ही सुजलाम सुफलाम होण्यास फार काळ लागणार नाही, असं स्थानिकंचं मत आहे.