Nagpur News : दीक्षाभूमीवर उसळला बौद्ध अनुयायांचा जनसागर; महामानवाला देवेंद्र फडणवीसांकडून अभिवादन
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत देशातील सर्व नागरिक आणि बौद्ध अनुयायांना शुभेच्छा दिल्या.
Dr Ambedkar Jayanti 2024 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांच्या 133 व्या जयंती निमित्याने अवघ्या देशभरात नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेय. त्याच अनुषंगाने नागपुरातील (Nagpur News) दीक्षाभूमीवर देखील काल मध्यरात्री पासून शेकडो बौद्ध अनुयायांचा जनसागर महामानवाला अभिवादन करण्यासाठी उसळाला असल्याचे चित्र आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आज दीक्षाभूमीवर भेट देत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी देशातील सर्व नागरिक आणि बौद्ध अनुयायांना जयंती निमित्य शुभेच्छा दिल्या.
संविधान हे सर्वोच्च आणि सर्वशक्तिमान
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता पवित्र दीक्षाभूमीवर मी आज आलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला असे संविधान दिले की, त्यामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळालाय. तसेच समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचा मार्ग त्या निमित्ताने मोकळा झालाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एक मजबूत देश तयार होतोय. त्याचे कारण म्हणजे भारताचे संविधान हे असून हे संविधान जगातले सर्वोच्च आणि शक्तिमान असे संविधान असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र स्वतः म्हणतात की, मला कुठल्याही ग्रंथापेक्षा भारताचे संविधान महत्वाचे आहे. आज या संविधानामुळेच भारत प्रगतीपथावर पोहोचला असल्याचे ते सांगतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या काळामध्ये ते देशाचे मंत्री होते, तेव्हा त्यांनी देशात जलसंधारणाचे, विद्युत असेल किंवा कामगार, कष्टकऱ्यांकरता असंख्य मूलभूत कामे केलीत. त्यावरच आज आपला देश उभा आहे. त्यामुळे अशा या महामानवाला वंदन करण्यासाठी मी पवित्र दीक्षाभूमी स्थळी आल्याचही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जयंत पाटील अतिशय निराश
जयंत पाटील यांनी भाजपवर केलेल्या आरोपांनाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, जयंत पाटील हे अतिशय निराश आहे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असून ते फार मनावर घेण्यासारखे नाही. खरं तर माझे त्यांना सांगणे आहे कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यावेळी त्यांना सर्व पक्षानी मिळून पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निवडलं, त्यावेळी त्यांनी आपल्या पुढे संविधान ठेवलं होतं आणि सेंट्रल हॉलमध्ये संविधानाची पूजन करूनच त्यांनी सर्व पक्षाचे उमेदवार होणे स्वीकारलं असल्याचे सांगत जयंत पाटीलांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलय.
गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री काय म्हणाले?
सलमान खानच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना सकाळी उजेडात आली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहे. त्या संदर्भात योग्य ती माहिती लवकरच पुढे येईल. तेव्हा त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर बोलेल. मात्र, सध्याघडीला त्यावर आधिक बोलणे उचित नसल्याचे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी याविषयी अधिक बोलण्याचे टाळले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या