(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : कापड गिरण्यांप्रमाणे साखर कारखान्यांची अवस्था होऊ देऊ नका; कामगारांच्या मेळाव्यात शरद पवार यांचे आवाहन
कापड गिरण्यांप्रमाणे राज्यातील साखर कारखानदारीची अवस्था होऊ नये, त्यामुळे राज्यातील बंद पडलेल्या साखर कारखाने सुरू करणे हे गरजेचे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
सांगली: सध्या एकच धंदा तोही सामूहिकरितीने टिकून आहे, तो म्हणजे कारखानदारी, तोही या साखर कामगारामुळे. मात्र बंद पडलेले साखर कारखाने हा महाराष्ट्रामध्ये नवीन प्रश्न आहे. ज्या पद्धतीने कापड गिरणी बंद पडल्या तसे हे कारखाने बंद पडू नयेत. त्यासाठी एकूण कारखानदारी आणि कामगार यांच्या समस्यावर तात्काळ बैठक लावा. एका-एका कारखान्याच्या खोलात जाऊन तो का बंद पडला, तो कारखाना पुन्हा सुरू करायला काय करावं लागेल हे पाहूया असं म्हणत कारखानदारी क्षेत्राला उर्जितावस्था देण्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांच्या वतीने इस्लामपूरमध्ये राजारामबापू पाटील साखर कारखान्यावर आयोजित साखर कामगारांच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
यावेळी साखर कामगारांना पगारवाढ मिळवून दिल्याबद्दल शरद पवार यांचा साखर कामगारांच्या वतीने सत्कार केला गेला. मेळाव्यास जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह साखर कामगार प्रतिनिधी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्या दरम्यान साखर कामगार प्रतिनिधींनी बंद पडलेले साखर कारखाने, कामगारांचे थकीत पगार आणि अनेक अडचणी आणि प्रश्न मांडले.
कापड गिरण्यांप्रमाणे राज्यातील साखर कारखानदारीची अवस्था होऊ नये, त्यामुळे राज्यातील बंद पडलेल्या साखर कारखाने सुरू करणे हे गरजेचे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. यासाठी तातडीने सहकार आणि कामगार मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना देखील शरद पवारांनी दिल्या.
यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न उपस्थित करत सहकारी साखर कारखानदारीतील नोकर भरती ही मुळावर उठल्याचे मान्य केले. हसन मुश्रीफ म्हणाले की, पगार कोटींच्या घरात आहेत, साखर वाटप, यामुळे साखर कारखानादरी अडचणीत आली आहे. त्यामुळे नोकर भरती बाबत नियम अटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्तीवर लावणे गरजेचे आहे. त्याच बरोबर साखरेला 34 रुपये दर आल्याशिवाय साखर कारखानादारी किमान फायदात येणार नाही. आज खाजगी आणि सहकारी कारखादारीत स्पर्धा सुरू झाली आहे आणि सहकारी कारखानदारी टिकवायची असेल ,तर यापुढे कठोर निर्णय घेतले पाहिजेत.
शरद पवार म्हणाले की, आज कारखानादारी संख्या शेकडोंनी वाढली आहे, एकेकाळी महाराष्ट्रात कपड्याचे व्यवसाय मोठा होता, संपूर्ण महाराष्ट्रात गिरण्या होत्या. मुंबईत सर्वाधिक होत्या पण आता एक गिरणी शिल्लक आहे. पण एकच धंदा सामूहिकपणे टिकून आहे, वाढतोय, तो म्हणजे साखर कारखानादारी. कामगारांच्यामुळे हे शक्य झाले आहे. पण आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बंद पडलेले कारखाने. बंद कारखान्यांचे मशीन गंजून जात आहेत, एकदा ते बंद पडले की पुन्हा चालत नाही. काही लोकांच्या खाण्याचे वृत्तीमुळे कारखाने अडचणीत आले. पण बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. यासाठी तातडीने बसण्याची गरज आहे. सहकारी आणि कामगार मंत्री यांनी पुढाकार घेऊन सर्वांना सोबत घेऊन येत्या काही दिवसात बैठक घ्यावी, आपणही यामध्ये सहभागी घेऊ आणि बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी काही निर्णय घेण्याचे असेल तर कसा घेता येईल याचा विचार करावा लागेल. मुंबईचे गिरण्या बंद पडल्या, गिरणगावची वखार झाली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर तशी वेळ येता कामा नाही. या दृष्टीने बघितले पाहिजे, असे मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.
वसंतदादाचा कारखाना आज खासगी लोकांच्या हातात गेला, हे दुर्दैव
साखर कामगार मेळाव्यात शरद पवार यांनी सांगलीतील वसंतदादाच्या साखर कारखान्याच्या आताच्या परिस्थितीवर भाष्य केले. सांगलीतील वसंतदादाच्या नेतृत्वाखाली चालणारा कारखाना एक नंबरचा कारखाना होता, पण तो सहकारी कारखाना राहिला नाही. तो काही खासगी लोकांच्या हातात गेला. वसंतदादांचा नावलौकिक देशात साखर धंद्यामध्ये मार्गदर्शक असा होता, पण आज वसंतदादांच्या कारखान्याची अवस्था आज चांगली नाही. मात्र एकेकाळी वसंतदादाच्या कारखान्याचा आदर्श राज्यातील कारखानदारीसमोर होता असे पवार म्हणाले.