दीड महिन्याच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश
एका लहानशा चुकीमुळे रियांश आणि त्याच्या आई-वडील एका मोठ्या दिव्यातून जावं लागलंय. 21 नोव्हेंबरला सकाळी मालिश करतांना नाक साफ करण्यासाठी रियांश मडावी या चिमुकल्या बाळाच्या आजीने नाकात सेफ्टी पिन टाकली.
चंद्रपूर : दीड महिन्याच्या एका बाळाच्या श्वसननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश आलय. चंद्रपूर शहरातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये ब्रॉनकोस्कोपी (Broncoscopy) करून ही पिन काढण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा आपण लहान मुलांच्या बाबतीत अजाणतेपणी करत असलेल्या चुका प्रकर्षाने समोर आल्या आहेत.
एका लहानशा चुकीमुळे रियांश आणि त्याच्या आई-वडील एका मोठ्या दिव्यातून जावं लागलंय. 21 नोव्हेंबरला सकाळी मालिश करतांना नाक साफ करण्यासाठी रियांश मडावी या चिमुकल्या बाळाच्या आजीने नाकात सेफ्टी पिन टाकली. मात्र अनावधानाने ती पिन नाकातून घशात आणि घशातून श्वसननलिकेत गेली आणि बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वरोरा शहरात राहणाऱ्या मडावी कुटुंबाने आणि त्यांच्या घरमालकाने तातडीने त्या बाळाला जवळच्या रुग्णालयात नेले मात्र ती सेफ्टी पिन श्वासनलिकेत अडकल्यामुळे त्याला चंद्रपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. श्वसननलिकेत अडकलेली ही सेफ्टी पिन बाळाच्या जीवासाठी धोकादायक ठरली असती. मात्र चंद्रपुरातील प्रसिध्द नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ.मनीष मुंदडा यांनी अतिशय काळजीपूर्वक ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून ही सेफ्टी पिन बाहेर काढली. मुख्य म्हणजे जीवाशी आलेल्या या प्रसंगातून बाळ सुखरूप बचावले असले तरी डॉक्टरांनी लहान मुलांच्या कान-नाक-घश्यात अशा वस्तू न टाकण्याचे आवाहन केले आहे.
डॉक्टरांच्या मते,
- लहान मुलांच्या कान-नाक-घश्यात कुठलीही वस्तू टाकून मळ काढू नये. इअर बड देखील टाकू नये, कानातला मळ हा निसर्गाने कानाच्या सुरक्षेसाठी तयार केलेली वस्तू आहे.
- लहान बाळांचे नाक सुद्धा स्वच्छ करण्याची चेष्टा करू नये.
- लहान बाळांच्या काना-नाकात तेल टाकू नये, त्यामुळे बुरशी येऊन जंतूसंसर्ग होऊ शकतो.
- लहान मुलांच्या कानात कुठलेच इअर फोन्स लावू नये.
- पाच वर्षांपर्यतच्या लहान मुलांना काजू, बदाम, शेंगदाणे, फुटाणे या सारखे पदार्थ बारीक केल्या शिवाय खायला देऊ नये. अनेक वेळा त्याचा एखादा तुकडा श्वासनलिकेत अडकू शकतो.
नवजात मुलं गुटगुटीत, सुंदर आणि गोरीपान दिसावी या साठी आपल्याकडे मोठे प्रयत्न केले जातात. लहान मुलांचं संगोपन करतांना अनेक गोष्टी या प्रथा-परंपरेतून आल्या आहेत म्हणून देखील पाळल्या जातात. मात्र लहान मुलांच्या संगोपनात अजाणतेपणी आपण काही चुका तर करत नाही ना हे तपासण्याची या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सर्व पालकांवर वेळ आली आहे. आपल्या कुटुंबियांच्या हातून अजाणतेपणी जी चूक झाली आहे ती पुन्हा कोणी करू नये अशी कळकळीची विनंती रियांशची आई शिल्पा मडावी यांनी सर्वांना केली आहे.