शिक्षकांवर ही वेळ येऊ देऊ नका, एक दिवसात प्रश्न मार्गी लावा 56 वर्ष मी विधानसभा लोकसभा राज्यसभेत काम केलंय, निधीची तरतूद कशी करायची मला माहीत आहे; शरद पवारांकडून सरकारला खडे बोल
Sharad Pawar: शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचे शरद पवार यांनी सांगत एक प्रकारे शिक्षकांना चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ येते हे बरोबर नसल्याची प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar: गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिल्यानंतर आज दस्तूरखुद्द शरद पवार यांनी सुद्धा भेट देत शिक्षकांचे मनोबल उंचावलं. यावेळी शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचे शरद पवार यांनी सांगत एक प्रकारे शिक्षकांना चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ येते हे बरोबर नसल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी गेल्या 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं असून निधीची तरतूद कशी करायची मला माहित असल्याचे सांगत महायुती सरकारला खडे बोल सुनावले. विविध मागण्यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून समर्थन दिलं जात आहे.
शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका
शरद पवार म्हणाले की शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्या आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत आहे. शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नसल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की तरतूद न करण्यात आलेला आदेश हा कचरा टाकण्यासारखाच आहे. ज्ञानदाना करणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे ते म्हणाले. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून आपण काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांनी सरकारकडे एक दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
राज्यातील सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर 10 महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर 8 व 9 जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये सध्या 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक व 3,040 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक व 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या

























