जयंत पाटलांचा 112 आपत्कालीन नंबरला फोन! 15 मिनिटात मिळाली पोलिसांची मदत
Dial 112 : सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पोलीस दलाकडून सुरु करण्यात आलेल्या 112 या हेल्पलाईन क्रमांकावर नमुना स्वरुपात स्वत: फोन करुन तक्रार नोंदविली.
सांगली : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या 'डायल 112' (Dial 112) या उपक्रमाची माहिती घेतल्यानंतर थेट 112 नंबरवर कॉल करत आपल्या मित्रावर खुनी हल्ल्या झाल्याची माहिती देत 112 वर पोलिसांकडे मदत मागितली. यावेळी कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यानी संपूर्ण पार्श्वभूमी एकूण घेत तात्काळ मदत पाठवण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी जयंत पाटील यांनी संजय बजाज नावाने फोन करून पोलिसांना कळवले आणि पोलिसांच्या मदतीचे वाट पाहू लागले आणि 15 मिनिटात पोलिसांनी दाद देत मदत त्यांच्यापर्यंत पोहचली. त्यामुळे पोलिसांच्या 'डायल 112' या उपक्रमामुळे नक्कीच संकटात सापडलेल्या नागरिकांना महिलांना तात्काळ मदत मिळेल याची खात्री मंत्री जयंत पाटील यांना झाली. मात्र या संभाषणावेळी पोलिसांच्या प्रश्नामुळे जयंत पाटील यांना हसू आवरता आले नाहीत. सांगलीतील पोलीस दलाच्या वाहन लोकार्पण कार्यक्रमात त्यांनी 'डायल 112' या नंबरची ट्रायल घेतली आणि उपस्थित सगळे अवाक झाले.
सांगली पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवरील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दलासाठी अद्ययावत वाहने आणि सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी पोलीस दलाकडून सुरु करण्यात आलेल्या 112 या हेल्पलाईन क्रमांकावर नमुना स्वरुपात स्वत: फोन करुन तक्रार नोंदविली. यावेळी पोलीस विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या वेळे आधीच पोलीस या ठिकाणी हजर झाले. याबद्दल जयंत पाटील यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस तात्काळ पोहचले पाहिजेत, यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरासाठी काही नाविन्यपूर्ण कल्पना राबविता येईल. यामध्ये मोटरसायकलवरुन फिरते बीट मार्शल किंवा बिट अंमलदार यांची नियुक्ती करता येईल का? याबाबत पोलिसांनी अभ्यास करावा, जेणे करुन गुन्हेगाराला तात्काळ अटक करता येईल किंवा गुन्ह्यावर आळा घातला येईल, अशी सूचनाही यावेळी जयंत पाटील यांनी पोलिसांना केली.
सांगली पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कार्यपध्दतीमुळे गुन्ह्याचे प्रमाण कमी होत आहे. जनमानसात पोलिसांच्या प्रती विश्वासहर्ता निर्माण होत आहे. तसेच पोलीस आणि त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढत आहे. शिराळा पोलीस स्टेशनला आयएसओ नामांकित करुन देशात 7 वा क्रमांक पटकविला आहे. याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख आणि सांगली पोलीस दलाचे अभिनंदन केले. नागरिकांची सुरक्षितता ही महत्वाची असून पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आणखी निधीसाठी पाठपुरावा करु, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कडेगावच्या आजोबांची कमाल... नातीचं ग्रँड स्वागत! पुण्याहून गावी आणायला पाठवलं हेलिकॉप्टर
- पोस्ट कार्यालयांना इंटरनेट दृष्ट्या बळकट करण्यासाठी खासगी कंपन्यांची सेवा घेण्याची परवानगी द्या ; डॉ. श्रीकांत शिंदेंची मागणी
- Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयाचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha