(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Dharmaveer 2 : धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग आला त्यानंतर शिवसेनेत भूकंप आला होता. आता दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात कोणता भूकंप येणार याची उत्सुकता आहे.
मुंबई : धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या सिनेमातूनही पहिल्या भागाप्रमाणेच राजकीय भाष्य करण्यात आलंय. पण पहिल्या भागानंतर जसा राजकीय भूकंप घडला होता, तसा भूकंप आता घडणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. तरीही विधानसभा निवडणुकीचं टायमिंग साधत शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडल्याचं बोललं जातंय.
धर्मवीर 2 सिनेमा प्रदर्शित झाला आणि आता पुढे राजकारणात कोणता भूकंप घडणार? असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. कारण धर्मवीरचा पहिला भाग प्रदर्शित झाला त्यानंतर काही दिवसांतच एकनाथ शिंदेंनी ऐतिहासिक बंड केलं. त्यामुळे धर्मवीर 2 मध्येही राजकीय भाष्य करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जाणार हे लोकांनी गृहितच धरलं होतं.
बंडामागचं कारण सांगितलं
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या बंडामागची कारणं सांगत त्याचं समर्थन करण्याचा आणि सोबत आलेल्या आमदारांच्या अस्वस्थतेमागची कारणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
अर्थात ही नाण्याची एकच बाजू आहे. एकनाथ शिंदे म्हणजे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचं ठसवण्याचाही प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत सहभागी होताना हिंदुत्वाला तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येतो. त्याचीही झलक धर्मवीर 2 मध्ये दिसते.
शिवसेनेतील अनेक नेते पडद्यावर
आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांच्याही व्यक्तिरेखा आपल्याला चित्रपटाच्या पडद्यावर दिसतात. शिंदे गटाची मविआ सरकारच्या काळातली राजकीय अस्वस्थता ते मांडतात. आता या सिनेमावरून राजकीय टोलेबाजीही सुरू झालीय.
धर्मवीरचा पहिला भाग प्रदर्शित झाला तेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसोबत होते. तेव्हा शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आवर्जून तो सिनेमा दाखवला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी सिनेमाचा शेवट पाहू शकलो नसल्याचं म्हटलं होतं.
राजकीय परिणाम किती होणार?
धर्मवीरचा पहिला भाग प्रदर्शित झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं ऐतिहासिक बंड झालं. महाराष्ट्रात अभूतपूर्व असा राजकीय भूकंप झाला. आता धर्मवीर 2 प्रत्येकाला भावेल का हा प्रश्न आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं उद्दिष्ट ठेवून हा चित्रपट बनवल्यानं त्याचा राजकीय परिणाम किती होईल, हीच खरी उत्सुकता आहे.
ही बातमी वाचा: