Dharashiv News : धक्कादायक! चॉकलेटच्या आडून गर्भपाताच्या गोळ्यांची वाहतूक; पोलीस आणि एफडीएची कारवाई
Dharashiv News : यावेळी वाहनात चॉकलेट, गोळ्या, तसेच मच्छर मारण्याचे लिक्विडही आढळून आले
Dharashiv News : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क चॉकलेटच्या आडून गर्भपाताच्या गोळ्यांची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांसह औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. उत्तेजना वाढवणारी औषधी व गर्भपाताच्या गोळ्यांची वाहनातून अवैधपणे वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्याने औषध प्रशासन व परंडा पोलिसांनी सापळा लावून शुक्रवारी ही कारवाई केली आहे. यावेळी वाहनात चॉकलेट, गोळ्या, तसेच मच्छर मारण्याचे लिक्विडही आढळून आले. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीकडे औषध विक्रीचा परवाना व बिले आढळून न आल्याने त्याच्याविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश ढोबळे (रा. बार्शी) असे आरोपीचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपात व उत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्यांची अवैध विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान परंडा शहरात एका वाहनातून अवैधरित्या गर्भपात व उत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्यांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती औषध प्रशासनास मिळाली होती. या माहितीच्या आधारे औषध प्रशासनाचे पथक वाहनाचा शोध घेत होते. तर शुक्रवारी बार्शी तालुक्यातील एक व्यक्ती वाहनातून गोळ्या औषधे घेऊन परंडा शहरात फिरत असल्याची माहिती औषध प्रशासनास मिळाली. या माहितीच्या आधारे औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भुजबळ आणि इतर पोलिसांच्या मदतीने परंडा बसस्थानक परिसरात सापळा लावला.
लाखो रुपयांच्या उत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्या
पोलीस आणि औषध प्रशासनाचे पथक सापळा लावून बसले असतानाच यावेळी एक कार औषध घेऊन जाताना पोलिसांना दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी वाहनास तात्काळ थांबवून झडती घेतली. यावेळी कारमध्ये बार्शी तालुक्यातील आकाश ढोबळे याच्याजवळ लाखो रुपयांच्या उत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या. शिवाय, त्याच्याकडे औषध विक्रीचा परवाना व औषधांची बिलेही आढळून आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सहज मिळतात गोळ्या
तरुणांमध्ये उत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्याचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे याची मागणी लक्षात घेता धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात अवैधरित्या उत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्याची विक्री सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच गर्भपाताच्या गोळ्या देखील सहज उपलब्ध होत आहे. अनेक मेडिकल चालक याची अवैधरीत्या विक्री करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: