Dhananjay Munde : अंगावर आले तर शिंगावर घ्या, ओबीसींची वज्रमुठ दाखवून द्या; धनंजय मुंडेंचे आवाहन
Dhananjay Munde Beed Speech : यापुढे देशाचे नेते छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आपण ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करायचे असं माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे म्हणाले.

बीड : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. आमच्या हक्काचं आरक्षण देणार असाल तर त्याला आम्ही विरोध करणार असं वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं. यापुढे ओबीसी आरक्षणाला लढा हा देशाचे नेते छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार. येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींची ताकद दाखवून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. बीडमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावरही टीका केली.
Dhananjay Munde Beed Speech : धनंजय मुंडे यांचे भाषण
एका व्यक्तीने जाती-जातीत एवढी भांडणं लावली, माणसात माणूस ठेवला नाही. लोकसभेच्या आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये सख्खे दोन भाऊ एकमेकांविरोधात लढले. एक निवडून आला, दुसरा निवडून आला. त्यांच्यामध्ये एकमेकांविरोधात आई-बहिणीवरुन शिव्या सुरू झाल्या. इतकं विष पेरलं गेलं.
आम्ही काही बोललो तर तो लगेच बोलणार. पण यामध्ये मराठा समाजाचा काहीही फायदा नाही. ओबीसींमध्ये आल्यानंतर मराठा समाजाचं नुकसानच होतंय, ईडब्लूएसचं आरक्षण गेलं. त्यामुळे एमपीएससी परीक्षेमध्ये त्यांना तोटा झाल्याचं नुकताच लागलेल्या निकालावरुन स्पष्ट झालं.
मराठा समाजातील गरिबातील गरीबाचा फायदा करायचा असेल तर त्यांना ईडब्लूएस शिवाय पर्याय नाही. कशाला त्या बिनडोक माणसाच्या नादाला लागताय? आपणच लई वाचाळ आहे असं त्याने समजायचं कारण नाही. आम्हालाही आमच्या भाषेत बोलता येतं. दसऱ्याचा मेळावा संपल्यावर त्याने 1994 चा जीआर काढा असं म्हणाले. वंजारी समाजाचं दोन टक्के आरक्षण काढा असं त्याने म्हटलं. पण काढायचं राहू द्या, न्यायाने द्यायचं शिका.
आजही मराठ्यांनी त्यांचे वेगळं आरक्षण घ्यावं, ईडब्लूएसमधून घ्यावं. आमचा त्यांना विरोध नाही. पण आमच्या ताटातील काही घेत असाल तर आम्ही त्याला विरोध करणार.
आपली ताकद ही भुजबळ साहेब आहेत. ते देशाचे नेते आहेत, आपल्या ओबीसी समाजाचं आरक्षण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण टिकवून ठेऊ. आपलं ओबीसी आरक्षण आपल्याला टिकवायचं आहे. यापुढे कुणाला घाबरायचं नाही. कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायचं.
आपसातले वाद बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये एकमेकांच्या विरोधात राहू नका, एकीने राहा. त्यामध्ये आपली ताकद दाखवून द्या.
ही बातमी वाचा:























