एक्स्प्लोर
सर्वात आधी बाजारात येणारा देवगड हापूस यंदा महिनाभर उशिरा!
सध्या देवगड तालुक्यातील बहुतांशी हापूस आंब्यांच्या बागा आता फळधारणेच्या अवस्थेत आहेत. यामुळे हंगाम मार्चमध्येच सुरु होणार आहे. आंब्याला ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत तीन टप्प्यात मोहोर येतो.
सिंधुदुर्ग : जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा महिन्याभर उशिरा बाजारपेठेत दाखल होणार आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओखी वादळाचा फटका आता देवगडच्या प्रसिद्ध हापूसला बसला आहे.
आंब्याच्या हंगामात सर्वात आधी बाजारात येण्याची ख्याती असलेला देवगडचा हापूस आंबा यंदा बाजारात ओखी वादळामुळे चक्क महिनाभर उशिरा येणार आहे. त्यामुळे सुरवातीच्या मिळणाऱ्या दराचा फायदा यंदा हापूस आंबा उत्पादकांना होणार नाही.
सध्या देवगड तालुक्यातील बहुतांशी हापूस आंब्यांच्या बागा आता फळधारणेच्या अवस्थेत आहेत. यामुळे हंगाम मार्चमध्येच सुरु होणार आहे. आंब्याला ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत तीन टप्प्यात मोहोर येतो.
पहिला मोहोर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये, दुसरा डिसेंबर, जानेवारीमध्ये, तर तिसरा मोहोर फेब्रुवारीत येतो. ऑक्टोबरमध्ये जो मोहोर येतो तो आंबा साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात येतो. हा आंबा बाजारात येण्यासाठी देवगड भागातील बागायतदारांची ख्याती आहे. लवकर आंबा आल्याने याला हंगामापेक्षा जवळ जवळ दुप्पट दर मिळतो.
यंदा हवामान चांगले असल्याने नोव्हेंबरमध्ये मोहोर चांगला आला. अचानक वादळ झाल्याने थंडी कमी झाली, त्यातच कोकण किनारपट्टीवर पाऊस सुरु झाल्याने नोव्हेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे अस्तित्वच संपुष्टात आले. या मोहोराचे नुकसान झाल्याने फळे लागण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
डिसेंबरमध्ये मात्र हळूहळू थंडी वाढत गेली, त्याचा सकारात्मक परिणाम आंबा बागांवर झाला. ती फळे आता वाढीच्या अवस्थेत आहेत, पण ही फळे येण्यास मार्चच उजाडणार असल्याने यंदा फेब्रुवारीत देवगड हापूसचा आस्वाद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे देवगड तालुक्यातील चित्र आहे.
40 ते 50 टक्क्यांनी फटका बसणार?
गेल्या वर्षी हापूसचे उत्पादन उच्चांकी होते. केवळ देवगड तालुक्यातच 50 ते 60 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी अनुकूल हवामान असल्याने देवगड हापूसचे उत्पादन चांगले झाले. बहुतांशी झाडांना एक वर्षाआड मोहोर येत असल्याने यंदा काहीसे उत्पादन घटण्याची शक्यता बागायतदारांची आहे. यातच अर्ली आंब्याचे उत्पादन होणार नसल्याने तो उत्पादन घटीचा तोटा ही गृहीत धरता एकूणच यंदा आंब्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 ते 50 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement