(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मातोश्रीचे दरवाजे त्यांनी बंद केलेत, तरीही रश्मी वहिनींना म्हणालो, उद्धवजींना माझा नमस्कार सांगा; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis, Majha Maharashtra Majha Vision 2023: मातोश्रीचे दरवाजे उद्धव ठाकरेंनीच माझ्यासाठी बंद केलेत, माझा फोनही त्यांनी घेतला नाही, 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांची खंत बोलून दाखवली.
Devendra Fadnavis, Majha Maharashtra Majha Vision 2023: एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या आणि उद्धव ठाकेरंच्या मैत्री कटुता आलीये का? या प्रश्नावर भाष्य केलं. मातोश्रीचे (Matoshree) दरवाजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच माझ्यासाठी बंद केले. माझा फोनही त्यांनी घेतला नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात बोलताना दिली.
एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एबीपी माझ्याच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात प्रश्न विचारला. त्यावेळी उत्तर देताना फडणवीसांनी मातोश्रीचे दरवाजे त्यांनीच बंद केले आणि याचं मला दुःख आहे, असं म्हणत आपली खंत व्यक्त केली. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोटही केला. पण तरीही वैयक्तिक आजही माझं वैर नाही. आजही त्यांच्यासोबत मी चहा पिऊ शकतो. त्यांच्याशी मी गप्पा मारु शकतो, असंही फडणवीस म्हणाले.
प्रश्न : महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर, राजकीय वैर आणि खासगी वैर असं काही नव्हतं. राजकीय वैर वेगळं आणि खासगी मैत्री वेगळी असायची. उद्धव ठाकरे आणि तुमची खास मैत्री होती. पण गेल्या अडीच वर्षात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून कटुता खूप वाढली आणि राजकीय वैर खासगी वैरात रुपांतरीत झालं, असं वाटतंय...
मातोश्रीचे दरवाजे माझ्याकरता त्यांनी बंद केलेत, याचं मला दुःख : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दोन गोष्टी सांगतो. आजही माझं त्यांच्याशी वैर नाही. पण मातोश्रीचे दरवाजे माझ्याकरता त्यांनी बंद केलेत. माझा फोनदेखील त्यांनी घेतला नाही. पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो, ज्यांच्यासोबत सरकार चालवतो. कर्टसी म्हणून तरी, किमान फोन उचलून तुम्ही म्हणू शकता की, मला तुमच्यासोबत यायचं नाहीये. पण तुम्ही मातोश्रीचे दरवाजे हे माझ्याकरता बंद केले. याचं मला दुःख आहे."
मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आलेलं : देवेंद्र फडणवीस
"दुसरी गोष्ट अशी आहे की, हे त्यांनी केलं, कोणी केलं? पण एक गोष्ट सांगतो, मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकार राजकीय वैरानं वाढणारही नाही. पण या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकतील. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीत मला अडकवा आणि मला जेलमध्ये टाका, असे आदेश महाविकास आघाडी सरकारमधील होते. हेदेखील सत्य आहे. पोलीस प्रशासनातील कोणालाही विचारलं, तर तेदेखील हेच सांगतील."
पाहा व्हिडीओ : Devendra Fadnavis Majha Vision : देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन काय? माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन
रश्मी वहिनींना म्हणालो, उद्धवजींना माझा नमस्कार सांगा : देवेंद्र फडणवीस
"माझ्याकडून कोणतीही कटुता नाही. कोणतंही वैर नाही. राजकीयदृष्ट्या निश्चितपणे मी त्यांचा विरोधक आहे. अतिशय ताकदीनं मी त्यांचा विरोध करीन, पण वैयक्तिक आजही माझं वैर नाही. आजही त्यांच्यासोबत मी चहा पिऊ शकतो. त्यांच्याशी मी गप्पा मारु शकतो. परवा एका कार्यक्रमात मला रश्मी वहिनी भेटल्या. त्यावेळी मी वहिनींशीही बोललो. त्यावेळी त्यांनाही मी सांगितलं की, उद्धवजींना माझा नमस्कार सांगा. कारण महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. त्या संस्कृतीच्या पलिकडे मी कधीच जाणार नाही.", असंही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :