Devendra Fadnavis : श्याम मानव सुपारीबाजांच्या नादी लागलेत, अनिल देशमुख प्रकरणातील आरोपांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis On Shyam Manav Allegations : उद्धव ठाकरे, अजित पवारांवर आरोप करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता असा आरोप श्याम मानव यांनी केला होता.
मुंबई : काही सुपारीबाज तयार झाले असून ते सुपारी घेऊन आपल्यावर आरोप करतात, श्याम मानव (Shyam Manav) हे त्यांच्या नादी लागलेत का हे पाहावं लागेल असं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिले. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर दबाव आणल्याचा आरोप अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
अजित पवारांनी गुटखा व्यवसायिकांकडून कोट्यवधीची कमाई करून मागितली, उद्धव ठाकरेंनी 100 कोटी रुपयांची वसुली मागितली, आदित्य ठाकरेनी दिशा सॅलियनचा बलात्कार करून हत्या केली, अनिल परबांनी गैरववार केले असे चार अॅफिडेव्हिड द्या आणि ईडी प्रकरणातून सुटका करून घ्या अशी ऑफर अनिल देशमुखांना दिली होती असा दावा श्याम मानव यांनी केला होता. अनिल देशमुखांनी ते नाकारलं आणि 13 महिने तुरुंगवास भोगला असा दावा श्याम मानव यांनी केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
श्याम मानव सुपारीबाजांच्या नादी लागले का?
अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्याम मानव मला इतके वर्षे ओळखतात, आरोप करण्यापूर्वी मला एकदा विचारायला हवं होतं. अलिकडच्या काळात अनेक सुपारीबाज तयार झाले आहेत. सुपारी घेऊन आरोप करणे हे त्यांचं काम आहे. त्या सुपारीबाजांच्या नादाला श्याम मानव लागले का हे पाहावं लागेल.
मनोज जरांगेंच्या अटक वॉरंटमध्ये संबंध नाही
मनोज जरांगे यांच्याविरोधात निघालेल्या अटक वॉरंटमध्ये राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगेंची केस आहे ती 2013 सालची आहे. या पूर्वीदेखील त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आलं होतं. पण ते हजर राहिल्यानंतर ते रद्द झालं. आता पुन्हा ते तारखेला गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट निघालं. ते तारखेवर हजर राहिले तर वॉरंट रद्द होतात. आमच्यावरही असे अनेक वॉरंट निघाले आहेत. अटक वॉरंट निघालं आणि त्यावर कोर्टात हजर राहिलं तर ते वॉरंट नंतर रद्द होतं.
मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे गेल्या वेळी माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली. उपोषणामुळे त्यांना त्रास झाला होता, त्यामुळे तसं वक्तव्य झालं असं ते म्हणाले होते. आताही उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला असेल. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली असतील.
श्याम मानव यांनी काय आरोप केले होते?
अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटखा व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्यावी अशी मागणी केल्याचा जबाब तपास यंत्रणांकडे द्या.
अनिल देशमुखानी तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांचे नाव विविध खोट्या प्रकरणात घेतले तर ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ अशी थेट ऑफर त्यांना देण्यात आल्याचा धक्कादायक दावा श्याम मानव यांनी केला.
अनिल देशमुख यांना ते गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आले होते की तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल तर तुम्ही 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावे. आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सॅलियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावे. अनिल परब यांचेही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावे. मात्र अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही असे श्याम मानव म्हणाले.
ही बातमी वाचा: