(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट; तिघांवर आज शस्त्रक्रिया
जखमी प्रवाशांची उप मुख्यमंत्री, श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केली विचारपूस
मुंबई : नेपाळमधील पोखरा-काठमांडू दरम्यान प्रवासी बस एका नदीपात्रात कोसळून अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वैद्यकीय मदत कक्ष तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मदतीने आज नेपाळ येथून विमानाने मुंबई येथे आणण्यात आले. यामध्ये भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव येथील एकूण 7 जखमी प्रवाशांचा समावेश आहे. या सर्व प्रवाशांना विमानाने काठमांडू, नेपाळ येथून महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक व भारतीय जनता पक्षाचे रावेर लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमोल जावळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. हे सर्व प्रवाशी काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर सुखरुप पोहोचले.
उप मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दुपारी या जखमींची बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन विचारपूस केली. या दुर्दैवी बस अपघातातील 7 जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी सोबत उपस्थित होते. या 7 जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. उद्या आणखी 4 जखमींना मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, उप मुख्यमंत्री कार्यालया (विधि) अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत यासाठी संपूर्ण समन्वय ठेवला जात आहे. 23 ऑगस्ट रोजी नेपाळ मधील मर्स्यांगदी नदीत (Nepal Bus accident) महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली होती. या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाले असून 16 जखमी झाले होते. त्यापैकी बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल परिसरातील आहेत. यातील जखमींच्या उपचारासाठी देवेंद्र फडणवीस यांचा वैद्यकीय मदत कक्ष पुढे आला असून त्यांनी जखमींना विमानाद्वारे मोफत मुंबई (Mumbai) येथे आणले तसेच त्यांची मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची व्यवस्था केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह यापूर्वीच महाराष्ट्रात आणण्यात आले असून त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा त्यांना भेटून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.
ब्रेक फेल झाल्याने बसचा अपघात
अयोध्या दर्शन घेण्याबरोबर नेपाळमधील पशूपती नाथांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी वरणगाव येथील जवळपास 80 जण दोन बसच्या माध्यमातून नेपाळकडे निघाले होते. अयोध्या येथील श्रीराम मंदिर दर्शन झाल्यानंतर नेपाळमध्ये जात असताना काठमांडू जिल्ह्यात पोखरा पॉइंटवरून बस जात होती. एक बस सुरळीतरित्या पुढे निघाली, मात्र दुसऱ्या बस चालकाचे नियत्रंण सुटून थेट नदीत कोसळली. त्यामुळे बसमधील 27 जणांना जलसमाधी मिळाली. त्यामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत गेलेल्या अंकित जावळे यांच्या मातोश्री नीलिमा जावळे यांचाही समावेश होता. मात्र, बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे आता प्रवासी सीमा इंगळे यांनी सांगितलं आहे.