Devendra Fadnavis : विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Interim Budget 2024: मुंबई: आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी आपली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मिळेल मोठी चालना
या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरिब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे. देशातल्या 1 कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे. गरिब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चे घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतीकारी असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल, असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला.
विकसित भारताचा रोडमॅप
‘लखपती दिदी’ या कार्यक्रमातून 3 कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आला आहे. देशातील 9 कोटी महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे. 11 लाख कोटींची गुंतवणूक रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी करण्यात येते आहे. यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या गुंतवणुकीतून एकीकडे पायाभूत सुविधा निर्माण होत असताना रोजगारात सुद्धा वृद्धी होणार आहे. शेतकर्यांसाठी नॅनो डीएपी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकर्यांच्या शेतमालाला भाव आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यासाठीच्या विविध योजनांचा उहापोह या अंतरिम अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. विकासाची दिशा सांगणारा पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. विकसित भारताचा रोडमॅप पूर्णकालिन अर्थसंकल्पातून येईल, हा आत्मविश्वास देणारा सुद्धा हा अर्थसंकल्प आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Budget 2024: सर्वाइकल कॅन्सरपासून बचावासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस