Narmada Project Meeting : एकीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येण्याची चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, अमित शाहांची भेट घेणार
Devendra Fadnavis Delhi Visit : दिल्लीत अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : एकीकडे जयंत पाटील आणि विनोद तावडेंच्या भेटीच्या बातमीनंतर पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का अशा चर्चा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
बहुचर्चित आणि आंतरराज्यीय महत्त्वाच्या असलेल्या नर्मदा नदी खोऱ्यातील प्रकल्पां संदर्भात नवी दिल्लीत एक अत्यंत मोठी आणि निर्णायक बैठक होत आहे. नर्मदा प्रकल्पाशी (Narmada Project) संबंधित असलेल्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे.
नर्मदा खोऱ्यातील धरणांमुळे विस्थापित झालेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई आणि त्यांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Narmada Project Meeting : चार राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील (CR Patil) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नर्मदा प्रकल्पाचा विस्तार आणि त्यातील पाणी वाटप तसेच पुनर्वसनाचा भाग हा एकापेक्षा जास्त राज्यांशी जोडलेला असल्याने या बैठकीला सर्व संबंधित राज्यांच्या प्रमुखांना पाचारण करण्यात आले आहे.
बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav), राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे देखील उपस्थित राहणार आहेत. नर्मदा नदी आणि त्यावरील प्रकल्पांचा लाभ आणि परिणाम या चारही राज्यांवर होत असल्याने, सर्व मुख्यमंत्र्यांची एकत्र बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लावण्याचा गृह मंत्रालयाचा प्रयत्न आहे.
Narmada Bachao Andolan : प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनावर होणार चर्चा
नर्मदा बचाव आंदोलन आणि विविध संघटनांच्या माध्यमातून नर्मदा खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांकडून आपल्या न्याय्य हक्कांसाठी वारंवार आंदोलनं केली जातात. जमीन संपादन, घरांची झालेली पडझड, योग्य भरपाई न मिळणे आणि पुनर्वसनाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा असलेला अभाव यांबाबत प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा प्रशासनाकडे खंत व्यक्त केली आहे. अनेकदा आंदोलनं करूनही स्थानिक प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याची भावना विस्थापितांमध्ये आहे.
या सर्व मागण्यांसंदर्भात गेल्या काही काळापासून संबंधित राज्यांकडून केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. अखेर या सर्व राज्यांची संयुक्त बैठक होत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आजच्या या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील समन्वय वाढवून पुनर्वसनाचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय मोठे निर्देश देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
महत्त्वाच्या बातम्या





















