Devendra Fadanvis : पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंचं रडगाणं, 4 जूननंतरची तयारी आताच सुरू : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) प्रतिक्रिया देत, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन, संथ गतीने होणाऱ्या मतदानावरुन निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडलं होतं. विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई होत आहे, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या ढिसाळ कारभारावर हल्लाबोल केला होता.
उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) प्रतिक्रिया देत, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे 4 जून नंतरच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पार्श्वभूमी तयार करत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली.
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 20, 2024
आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची…
मुंबईकरांनो, बाहेर पडा, मतदानाचा हक्क बजावा
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला जातोय, मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवल्याचं दिसतंय असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. कितीही वेळ लागला तरी मतदारांनी मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलं.