Thane News : नागरिकांनो, भामट्या डिलिव्हरी बॉयपासून राहा सावध, ठाण्यात लुटला लाखोंचा ऐवज
Thane News : ठाण्यात डिलिव्हरी बॉयला पाणी देणे गृहिणीला चांगलेच महागात पडले आहे.
Thane News : कोरोना (Corona) सुरू झाला आणि प्रत्येक गोष्टीसाठी होम डिलिव्हरी (Home delivery) करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे साहजिकच डिलिव्हरी बॉय हे प्रत्येकाच्याच घरी येऊ लागले आहेत. मात्र याच डिलिव्हरी बॉयपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ठाण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका डिलिव्हरी बॉयने तब्बल दहा लाखांचा ऐवज लुटला आहे.
डिलिव्हरी बॉयला पाणी देणे गृहिणीला पडले महागात
ठाण्यात डिलिव्हरी बॉयला पाणी देणे गृहिणीला चांगलेच महागात पडले आहे. पाचपाखाडी येथील एका गृहसंकुलात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेत डिलिव्हरी बॉयने गृहिणीच्या नववीत शिकवणाऱ्या मुलाच्या गळ्यावर धारधार चाकू ठेवत तब्बल दहा लाखांचा ऐवज लुटला. मोबाईल, पैसे, हिरे व सोन्याचे दागिने घेऊन भामट्या डिलिव्हरी बॉयने धूम ठोकली. पळून जाणाऱ्या या चोरट्याचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. हाच भामटा एका प्रतिष्ठित होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीचे कपडे घालून डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून हिरेन शहा यांच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांची पत्नी आणि नववीत शिकणारा त्यांचा मुलगा होता. त्यानेच, बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला आणि आम्ही कोणतेही ऑनलाईन ऑर्डर केलेली नाही असे त्या चोराला सांगितले. पण चोरट्याने त्याच्याकडे पाणी मागितले. घरातून पाणी आणण्यासाठी हा मुलगा जाताच, हा चोरटा त्यांच्या घरात घुसला. त्याने दरवाजा बंद केला आणि त्यांना धमकावू लागला. चोराला पाहून त्या मुलाने हातात चाकू घेतला आणि प्रतिकार केला मात्र तो चाकू चोरट्याने त्याच्याच गळ्याला लावला आणि शहा यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बिथरलेल्या त्यांच्या पत्नीने घरातील सोन्या-चांदीचे दागिने, डायमंडचे दागिने, काही रोकड आणि मोबाईल फोन त्या चोराला देऊन टाकले.
कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का
या घटनेमुळे हिरेन शहा यांच्या पत्नीला आणि त्या नववीत शिकणाऱ्या मुलाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. मात्र या भामट्या सोबत आणखी एक साथीदार असल्याचे आतापर्यंत झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. सोसायटीत सर्वत्र सीसीटीव्ही असल्यामुळे या चोरट्याने मुद्दाम चेहऱ्यावरील मास्क आणि डोक्यावरील टोपी काढली नाहीये. त्यामुळे त्याचा चेहराच दिसून येत नाही. त्यामुळे एक खूप मोठा पेच निर्माण झाला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा एका घटनेमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवर देखील संशय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे अशा घटना टाळायच्या असतील तर आपण देखील थोडे कष्ट घेण्याची गरज आहे.
हेही वाचा>