विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय : शिक्षण मंत्री उदय सामंत
ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना आल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षण मंत्री सामंत यांनी आज सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सामंत म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात एक समिती नेमली आहे. आयोगाकडून मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरचं समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. सर्व विद्यापीठांची आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची तयारी झालेली आहे. ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने आपत्कालीन निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड-19 साठी देवून सहकार्य करावे असे, आवाहन देखील सामंत यांनी यावेळी केले.
कोरोना टेस्टिंग प्रयोगशाळा
कोरोनाच्या टेस्टिंग प्रयोगशाळा सर्व विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे.तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे प्रयोगशाळा सुरू झाली आहे. .सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले असून ते लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापरले जाणार आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा रद्द करण्याची मार्डच्या सदस्यांची मागणी