येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार : अजित पवार
पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीतल सापडलेल्यांना नक्कीच मदतीचा हात दिला जाईल. मुख्यमंत्री सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि केंद्राला देखील याबाबत माहिती दिली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं.
सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांना माध्यमांशी संवाद साधला. शेतकरी व्यापारी यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीतल सापडलेल्यांना नक्कीच मदतीचा हात दिला जाईल. मुख्यमंत्री सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि केंद्राला देखील याबाबत माहिती दिली जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं.
राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. सर्व नुकसांनीची माहिती घेतली जात आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत. मात्र येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या विविध मागण्या आहेत. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करणार आहोत. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चांगला समन्वय आहे. केंद्राकडूनही राज्याला मदत सुरु आहे. दोन नुकसानीची माहिती मिळेल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे. सांगली, कोल्हापूर, रायगड, सांगली याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करतील. तळीये गावात साताऱ्यातील आंबेघर आणि मिरगावातही मोठं नुकसान झालं आहे. वायूदलाकडून जेवणाची पाकिटं वाटली जात आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अलिकडच्या काळात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती निवारण दलाचे केंद्र कराडला करण्याबाबतही राज्य शासन विचार करेल. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे अलमट्टी बरोबर समन्वय चांगला राहिल्याचे सांगून तसेच टेंभू, ताकारी, म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांची आवर्तने सुरू ठेवल्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी मदत झाल्याचे अधोरेखित केले.