(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dasara Melava 2023 : एक मैदान अन् एक नेता अन् एक मेळावा; बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत दोनवेळा शिवतीर्थावर मेळावा झाला नाही, काय होते कारण?
शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर पडला होता. तेव्हापासून ते आजतागायत एक नेता, एक सभा आणि एक मैदान हे समीकरण शिवसेनेचं राहिलं आहे.
Shiv Sena Dasara Melava : फक्त मुंबईच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेनं जगता येण्यासाठी, मराठी माणसाचे हक्क अबाधित राहावे या उद्दात्त भावनेतून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी करण्यात आली. याच शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर पडला होता. ही राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतरची शिवसेनेची पहिली राजकीय सभा होती आणि तेव्हापासून ते आजतागायत एक नेता, एक सभा आणि एक मैदान हे समीकरण शिवसेनेचं राहिलं आहे.
या पहिल्या सभेनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होत राहिला आणि हा एक शिवसेनेच्या राजकीय संस्कृतीचा भाग घेऊन गेला. त्यामुळे शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे कोणती भूमिका घेणार? कोणावर आसूड ओढणार? कोणावर ठाकरे शैलीतून प्रहार करणार? याची उत्सुकता जशी शिवसैनिकांमध्ये असायची, तशीच उत्सुकता राज्यभरातील सामान्य माणसांमध्ये असायची.
बाळासाहेबांच्या हयातीत दोनवेळा मेळावा नाही
बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही दोन प्रसंग असे आले होते, ज्यामुळे दोनवेळा दसरा मेळावा होऊ शकला नव्हता. 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 मध्ये मुंबईत प्रचंड पाऊस झाल्याने शिवतीर्थावरील दसरा मेळावा रद्द करण्याची वेळ आली होती. त्यानंतर तीन वर्षांनीच बाळासाहेबांच्या हयातीमध्येच असा एक प्रसंग आला, ज्यामुळे हा मेळावा होऊ शकला नाही. त्यावेळी निवडणूक आचारसंहिता लागल्याने मेळावा होऊ शकला नाही.
बाळासाहेबांचा शब्द काय आहे याची जाणीव 1991 मध्ये झाली
पुढील वर्षभरासाठी शिवसैनिकांसमोर कोणता राजकीय अजेंडा असेल या संदर्भाने ते मार्गदर्शन करत असत. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांनी मार्मिक आणि सामनाचा वापर कल्पकतेने केला. ज्या पद्धतीने त्यांनी शिवतीर्थावरून शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचे काम केलं, त्याच पद्धतीने त्यांनी सामना या दैनिकातून तसेच मार्मिक मधून विचारांची ऊर्जा देण्याचे काम केलं. त्याचबरोबर बाळासाहेबांचा शब्द काय आहे याची जाणीव पहिल्यांदा 1991 मध्ये झाली होती.
तेव्हा मुंबईमध्ये भारत पाकिस्तान हा सामना होऊ देणार नाही अशी घोषणा बाळासाहेबांनी शिवतीर्थावरून दसरा मेळावात केली होती आणि त्यानंतर आता सध्या मनसेसोबत असलेल्या कट्टर शिवसैनिक बाळा नांदगावकर यांनी त्यावेळी त्यांनी वानखेडे स्टेरिमची खेळपट्टीच उखडून टाकली होती. त्यामुळे हा सामनाच रद्द करावा लागला होता. यावरून बाळासाहेबांच्या शब्दांची कल्पना येते.
कोरोना महामारीमुळे बंदिस्त हॉलमध्ये हा मेळावा घ्यावा लागला
मात्र, 2020 आणि 2021 या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे बंदिस्त हॉलमध्ये हा मेळावा घ्यावा लागला होता. दुसरीकडे, 2010 मध्ये आदित्य ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातच लॉन्चिंग करण्यात आले. त्यांना युवासेना या संघटनेची घोषणा करण्यात आली. 2011 साली बाळासाहेबांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अखेरचा मेळावा पार पडला होता. 2012 साली प्रकृतीमुळे बाळासाहेबांचं रेकॉर्डेड भाषण दाखवण्यात आलं होतं. 2013 साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातला पहिला मेळावा पार पडला.
इतर महत्वाच्या बातम्या