Ajit Pawar On Dasara Melava : ठाकरे-शिंदेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, कटुता निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करु नये: अजित पवार
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी मेळाव्यात ही सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी, असं आवाहन अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना केलं आहे.
Ajit Pawar On Dasara Melava : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) या दोघांनी दसरा मेळाव्यात ही सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. त्यांनी स्वतःची ताकद जरुर दाखवावी, पक्ष वाढवण्याचं काम करावं, त्यांची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा ही त्यांना अधिकार आहे. पण लोकशाहीच्या परंपरा जपायला हव्यात, अनादर होणार नाही. याला कुठेही बाधा येणार नाही, अथवा डाग लागणार नाही. आजच्या दसऱ्याच्या दिवशी कोणतीही कटुता निर्माण होणार नाही, असं त्यांनी वागावं, असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
ठाकरे-शिंदे गटाचे वाद इतक्या पराकोटीला गेलेले आहेत, की यात कोणी पुढाकार घ्यायचा हा मूळ प्रश्न आहे. शब्दाने शब्द वाढत आहेत, एकाने आरे म्हटलं की दुसऱ्याने कारे म्हणायचं. यातून वाद खालपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळं त्यांना एकमेकांचे शत्रू वाटू लागतात. आपापल्या भूमिका सांगण्याचं कार्यक्रम झाला की राजकीय जोडे बाजूला ठेऊन, सलोख्याच्या भावनेने पाहायला हवं, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
...तरी शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही : अजित पवार
मी सभागृहात बोलतानाच एकनाथ शिंदे यांना बोलून वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. मात्र अद्याप हे वाद सुरुच आहेत. परंतु कोणताही वाद फार काळ टिकत नाही, त्यातून कटुता कमी होईल आणि जनतेसमोर हे दोघे जातील. उदाहरणार्थ 13 नोव्हेंबरला जी पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. चिन्ह गोठवलं जाणार. नाही गोठवलं तर कोणाला मिळणार असे अनेक प्रश्न आहेत. आमच्या बाबतही 1999 साली असंच घडलं होतं. काँग्रेसलाही अनेक चिन्ह घेऊन निवडणुका लढायला लागल्या. तेव्हा चिन्ह गावागावात पोहोचवणे कठीण व्हायचं, पण आता तंत्रज्ञानामुळे प्रत्येक चिन्ह घराघरात पोहोचते. त्यामुळे भविष्यात धनुष्यबाण हे चिन्ह नसलं तरी कोणताही फटका शिवसेनेला बसणार नाही, असंही ते म्हणाले.
माध्यमांवर अजित पवार यांचे टीकास्त्र
महागाई, बेरोजगारी याकडे दुर्लक्ष करायचं आणि नको ते बातम्या द्यायच्या. शिंदे-ठाकरे गटाचे दसरे मेळावे कसे पार पडत आहेत. बसेसची, खाण्याची सोय कशी आहे. हे दाखवत बसले आहेत. मला ही विचारतात उद्धव ठाकरेंचं की एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकणार. आता दोघांचं ऐकेन, पण त्यावरही पुढे विचारतात एकाच वेळी बोलले तर? अरे बाबा उद्धव ठाकरेंचं आधी ऐकेन मग एकनाथ शिंदेंचं ऐकेन. पण हा काय महत्वाचं प्रश्न आहे का? जे पाहायचं नाही ते दाखवतात. आता त्यांचा पक्ष आहे ते वाढवत आहेत, आमचं पक्ष आम्ही वाढवू, असंही म्हणत त्यांनी माध्यमांवर टीका केली.