Dapoli Sai Resort Case: दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपपत्रात ईडीने नेमकं काय म्हटले?
Dapoli Sai Resort Case: रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने आज आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ईडीने नेमकं काय म्हटले? जाणून घ्या...
Dapoli Sai Resort Case: ईडीने (ED) दापोलीतील (Dapoli) साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात (PMLA Court) आरोपपत्र दाखल केले. या मुद्यावरून राज्याच्या राजकारणात विशेषत: भाजप आणि शिवसेना शिंदे गटात आरोपांच्या फैऱ्या झडल्या होत्या. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना लक्ष्य केले होते. ईडीने या प्रकरणात चौकशीनंतर कारवाई केली. या प्रकरणी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली होती. त्याशिवाय, दोघांना अटक केली होती. आज दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने आज आरोपपत्र दाखल केले.
> आरोपपत्रात आहे तरी काय?
साई रिसॉर्ट प्रकरणाी जयराम देशपांडे व सदानंद कदम यांना ईडीनं अटक केली आहे. देशपांडे आणि कदम यांच्यासह सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे
याप्रकरणात तपास अद्यापही सुरू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे. या आरोपपत्रात सध्या 6 आरोपींविरोधात आरोप आहे. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या विरोधात कोणताही आरोप नाही.
मात्र, अनिल परबांच्या सहभागाचा आरोपपत्रात वारंवार उल्लेख आहे. या प्रकरणात तेच यात मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीचा रोख असल्याचे दिसून आले. ईडीच्या आरोपपत्रात एकूण 13 साक्षीदारांचा उल्लेख आहे. तर पंच साक्षीदारांसह 20 जणांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट आहेत.
>> आरोपपत्रातील मुद्दे
- मुरुड, दापोली येथे 1 एकर जमीन होती
- सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्या सांगण्यावरून हा सर्व व्यवहार केला
- मूळ सौदा 1 कोटी 80 लाखांत झाला. त्यापैकी 80 लाख रोख स्वरूपात दिले गेले
- हा भूखंड 'सीआरझेड-3' मध्ये होता, त्यामुळे तो नो डेव्हलपमेंट झोन होता
- अनिल परब यांनी 2 मे 2017 रोजी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेतला होता
PMLA अंतर्गत ईडीने केलेल्या तपासात काय आढळले?
- वर्ष 2017 च्या सुरुवातीच्या महिन्यात विभास साठे यांनी दापोलीतील जमीन विकण्यासाठी विनोद डेफोलकर या एजंटशी संपर्क साधला
- एजंटने खरेदीदार शोधण्यास सुरुवात केली आणि दापोली पुलाजवळ जमीन खरेदी करू पाहणाऱ्या सदानंद कदम यांच्या तो संपर्कात आला
- एप्रिल 2017 मध्ये एजंट विभास साठे यांना सदानंद कदम यांच्या कार्यालयात घेऊन गेला
- संभाषणादरम्यान सदानंद कदम यांनी दोघांकडे खुलासा केला की अनिल परब यांच्यावतीने हा व्यवहार करत आहेत
- सदानंद कदम म्हणाले की, अनिल परब 1 कोटी 80 लाखांतील 1 कोटी, खाते हस्तांतरणाद्वारे आणि तर उर्वरित 89 लाख रोखीनं देतील.
- 2 मे 2017 रोजी अनिल परब यांनी साठे यांच्या बँक खात्यातून एक कोटी रुपये दिले
- कालांतराने कदम यांनी साठे यांच्याकडे पास झालेल्या एजंटकडे रोख रक्कम सुपूर्द केली
- एजंटला कमिशन म्हणून 3 लाख मिळाले होते
- जमीन खरेदी करण्यामागे अनिल परबांचा त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी तिथं बंगला बांधण्याचा हेतू होता."
- वास्तुविशारदांनीही जमिनीला भेट दिली होती. परब यांनी जुळे बंगला बांधण्याची चर्चा केली होती. वास्तुविशारदाचाही जबाब नोंदवला आहे.
- कदम आणि परब यांच्या उपस्थित असलेल्या बैठकीत आर्किटेक्ट यांनी जमीन CRZ असल्याचं सांगितलं होतं.
- या जमिनीवर कोणतंही बांधकाम होऊ शकत नाही, हे आरोपी कदम आणि परब यांना चांगलेच ठाऊक होते
- अशाप्रकारे परस्पर समजुतीनुसार संपर्काचं काम केलं गेलं. संपर्काचे काम कदम यांनीच केले.
- अनिल परब यांच्या सूचनेवरून कदम यांनी डेफोलकर यांच्या संगनमताने प्रांतधिकारी, दापोली यांच्याकडे जुळ्या बंगल्याच्या बांधकामासाठी शेतजमिनीचे रूपांतर अकृषिक करण्यासाठी साठे यांची सही खोटी करून अर्ज केला गेला.
- परब यांच्यावतीनं कदम यांनी परबच्या प्रभावाचा वापर करून जमीन वापरात रूपांतरित करण्याची परवानगी मिळवली
- सदानंद कदम यांच्या दबावामुळे आणी अनिल परब यांच्या प्रभावामुळे आरोपी सुधीर परधुळे, तत्कालीन मंडळ अधिकारी दापोली यांनी घटनास्थळी न भेटता SDO यांना 31 जुलै 2017 रोजी तपासणी अहवाल सादर केला.
- परब यांनी सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बेहिशेबी पैसे रोखीत गुंतवून रिसॉर्ट बांधले
- फसवणूक उघडकीस आल्यानंतर कदम यांनी उशिरानं त्यांच्या वहीत बांधकामाचा खर्च दाखवला
- त्यानं साल 2020 ते 2021 दरम्यान खर्च केलेले 3.59 कोटी दाखवले
- तपासयंत्रणांनी छाननी सुरू केल्यानंतर बेहिशेबी रोख खर्चाला कायदेशीर मान्यता देण्यात आली
- विविध विक्रेत्यांकडे चौकशी केली असता असे उघड झाले आहे.