दापोली पोलीस स्थानकात कायदा म्युझियम आणि कचऱ्यातून सौंदर्य निर्मिती प्रकल्प, राज्यातील पहिले लक्षवेधी पोलीस स्टेशन
दापोली पोलीस स्थानक हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस ठाणे आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतेच्या संदर्भातील संदेश आणि कायद्याच्या संदर्भात म्युझियम आहे.
दापोली : कोकणाला अथांग असा समुद्र किनारा लाभला आहे. त्याच्या सौंदर्यात अधिक भर घातलेल्या उंच उंच नारळी, पोफळीच्या बागा..कौलारू घरे हे कोकणचं निसर्ग सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. त्यातील एक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली..या दापोलीत हर्णे, आंजर्ले, केळशी समुद्रकिनारे लाभल्यामुळे दापोली पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. या पर्यटनस्थळांचा आनंद लुटण्यासाठी इथे नेहमीच पर्यटकांची रेलचेल सुरु असते.आता येथे येणाऱ्या पर्यटकांना नवीन संग्राहलय पाहायला मिळणार आहे ते म्हणजे दापोलीचे पोलिस स्टेशन..
दापोलीत प्रवेशद्वारातून आत येताना बस स्थानकाच्या समोरच नजरेस पडते पोलीस स्टेशन. या पोलिस स्टेशनच्या परिसरात आत प्रवेश करताच समोरच आपल्याला पाहायला मिळतात. भिंतीवरील विविध सूचनांचे फलक, शोभीवंत झाडे, पोलिस कायद्याअंतर्गत होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणि समानता दर्शवणारे प्रतीकात्मक फलक आणि प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत.
दापोली पोलीस स्टेशन येथे दापोली पोलीस ठाणे आणि निवेदिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून साकार झालेले कायद्याचे म्युझियम आणि कचऱ्यातून सौंदर्य निर्मिती या प्रकल्प. या प्रकल्पाबाबत बोलताना प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत परांजपे त्यांनी सांगितले. दापोली पोलीस स्थानक हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस ठाणे आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतेच्या संदर्भातील संदेश आणि कायद्याच्या संदर्भातील बोलकं म्युझियम आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांनी इको-फ्रेंडली परांजपे म्युझियमला भेट दिली असता अशा पद्धतीचं वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं पोलीस स्टेशनमध्ये म्युझियम उभारण्याबाबत त्यांच्याकडे चर्चा झाली आणि त्यांच्या सकारात्मक मान्यतेमुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला.
वणवा, सर्वजनिक ठिकाणी थुंकणे, विना हेल्मेट गाडी चालवताना होणारे अपघात, अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गाडी न चालवणे, ट्रिपल सीट गाडी न चालवणे, त्याचप्रमाणे पोक्सो कायदा काय आहे. गाडी चालवताना मोबाइलवर बोलणं घातक आहे,अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात तसेच समानता दर्शवणारे प्रतीकात्मक फलक आणि प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
दापोली तालुका हे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे अनेक पर्यटक येत असतात. त्यांना स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे बाबत आणि पोलीस स्टेशनही पाहण्यासारखं एखादं ठिकाण असू शकतं अशी वेगळी ओळख मिळावी त्याचप्रमाणे नागरिकांना समाजभान राखण्यासाठी या म्युझियमचा निश्चितच उपयोग होईल.पोलीस स्थानकात महाविद्यालयीन विद्यार्थी रोज पाणी पिण्याच्या निमित्ताने येत असतात, त्यांच्या मनावरही चांगले संस्कार व्हावेत अशा अनेक बाबींचा विचार करून कायद्याच्या म्युझियमचे निर्मिती करण्यात आली आहे.