फेसबुकवर मोबाईल नंबर सेव्ह करणं महागात पडलं, तरुणाला साडेचार लाखांना गंडा
फेसबुकच्या माध्यमातून तरुणाची साडेचार लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फेसबूकवर व्हॉट्सअप नंबर सेव्ह केल्याने तरुणाला हा फटका बसला आहे.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यामातून एका उच्चशिक्षित तरुणाला तब्बल चाडेचार लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पूरग्रस्तांसाठी मदत देण्याच्या बहाण्याने तरुणाचा फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागात गुन्हा दाखल झाला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
बाबासाहेब डमाळे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली आहे. बाबासाहेब यांची पोलंडमधील रहिवाशी कॅरोल डी यांच्याशी फेसबूकवर ओळख झाली होती. बाबासाहेब यांनी फेसबुकवर आपला मोबाईल नंबर सेव्ह केला होता. त्यामुळे कॅरोलने बाबासाहेब यांच्याशी थेट संपर्क साधला. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करुन आपली संस्था सामाजिक काम करत असल्याचं सांगितलं. आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाजातील गरजू लोकांना मदत करतो, असं त्यांनी बाबासाहेब यांना सांगितलं. तुम्हीही भारतात आमच्या संस्थेचं काम करा, असं सांगून त्यांनी बाबासाहेब यांच्यासोबत मैत्री वाढवली.
त्यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीची आवश्यकता होती. म्हणून बाबासाहेब यांनी त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा नंबर दिला. मात्र फोन लागत नसल्याचं कारण त्यांनी दिलं आणि बाबासाहेब यांचा बँक खाते क्रमांक मागितला. या खातेक्रमांकावर त्यांनी पोलंडचं चलनरुपी 49 लाख 69 हजार रुपये जमा केले असल्याचा मेल पाठवला. त्यासाठी तुम्हाला कन्व्हर्ट चार्ज, जीएसटी चार्ज इत्यादी भरावा लागेल असं सांगितलं. त्यानुसार 4 लाख 53 हजार रुपये बाबासाहेब यांनी टप्प्याटप्प्याने कॅरोलने सांगितलेल्या बँक खात्यावर जमा केले. मात्र नंतर चौकशीनंतर आपली फसवणूक झाल्याचं बाबासाहेब यांच्या निदर्शनात आलं.
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बाबासाहेब डमाळे यांनी तातडीने सायबर गुन्हे विभागात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. दरम्यान बाबासाहेब डमाळेने दिलेल्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फसवणूक केलेल्या गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांमध्ये देशातील आणि विदेशातील लोक एकत्र येऊन गुन्हे करतात. अशा फसवणुकीला बळी न पडता आपली माहिती सोशल मीडियावर न टाकणे हाच एकमेव पर्याय आहे.
AJIt Pawar | अजित पवारांचा नवा आणि हटके लूक चर्चेत | ABP Majha