(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Currency: कोणी छत्रपती शिवराय घ्या तर कोणी महाराणा प्रताप घ्या... नोटांवरील फोटोवरुन राजकीय नौटंकी?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर गणपती आणि महालक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक मागण्यांचं सत्र सुरू झालं आहे.
मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर (Indian Currency) लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केजरीवाल यांच्या मागणीनंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी नोटावर वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो छापा अशी मागणी लावून धरली.
कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असं पूर्वी म्हणायचे.... पण आता चलनी नोटांच्या बाबतीत देखील कोणी गणपती घ्या कोणी लक्ष्मी घ्या... कुणी छत्रपती शिवराय, कुणी महाराणा प्रताप तर कुणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर... घ्या अशी म्हणायची वेळ येईल का असा प्रश्न पडला आहे. याचे प्रमुख कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर गणपती आणि महालक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक मागण्यांचं सत्र सुरू झालं. अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा अशी मागणी केली. तर काँग्रेसने नोटांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापा अशी मागणी लावून धरली.
आता सगळेच मागणी करत सुटल्यानंतर भाजपचे आमदार राम कदमही पुढे आले. त्यांनी तर नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो छापण्याची मागणी केलीच पण एक पाऊल पुढे जाऊन आपली मोदीनिष्ठा व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो नोटांवर छापा अशी मागणी केली. रिपाईच्या खरात गटातील सचिन खरात यांनी नोटांवर गौतम बुद्धांचे फोटो छापा अशी मागणी केली. एवढ्या सगळ्या मागण्या सुरू झाल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ही पुढे आल्या आणि त्यांनी नोटांवर सर्व देवतांचे फोटो छापून टाका अशी मागणी करून टाकली.
दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी पूजन करत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात विचार आला आणि त्यांनी लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्याची मागणी केली. पण आता ही मागणी हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबत चालली आहे. अनेक महापुरुषांचे फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर आता एखाद्या नेत्याने पोस्टाच्या तिकिटावर जशी स्वतःचे फोटो छापून घेण्याची योजना आहे. तशी योजना नोटांसाठी लागू करण्याची मागणी करू नये.
इतर महत्त्वाच्या बातम्या: