(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EXCLUSIVE | रोजगार हमीच्या कामावर चक्क कोरोना रुग्ण तेही रोहयो मंत्र्यांच्या गावात
औरंगाबादमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात कोरोनाची लागण झाली असलेल्या काही लोकांनी रोजगार हमीवर काम केलं आणि विशेष म्हणजे त्याचे पैसे देखील त्यांना मिळाले आहेत. एबीपी माझाच्या पडताळणीत बोगस यादी बनवल्याचं समोर आलं आहे. पाहूया एक्स्लुझिव्ह रिपोर्ट
औरंगाबाद : कोविड रुग्ण रोजगार हमीवर काम करु शकेल का? विश्वास बसत नाही ना. पण औरंगाबादमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात कोरोनाची लागण झाली असलेल्या काही लोकांनी रोजगार हमीवर काम केलं आणि विशेष म्हणजे त्याचे पैसे देखील त्यांना मिळाले आहेत.
औरंगाबाद-बीड बायपास हायवे ते साजेगाव रोड. या रस्त्याचं काम रोजगार हमी योजनेतून केले आहे. हा रस्ता कामगारांनी बनवला असं सांगितले जात आहे. रस्ता असा की एखाद्या जेसीबी किंवा पोकलेनने केल्यासारखा. कामगारांनी बनवला आहे यावर विश्वास बसत नाही. असो पण खरी गंमत पुढे आहे. या रस्त्याच्या कामावर अशा कामगारांनी काम केलंय जे कोविड पॉझिटिव्ह आहेत. हे आम्ही नाही तर सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोरडे यांनी आरोप केला आहे की, "हे सर्व कामगार बोगस आहेत. कामगार दाखवले आहेत ते गडगंज श्रीमंत आहेत. यातील पाच लोक कोविड रुग्ण आहेत. ज्या काळात त्यांना कोविड होता त्याच काळात त्यांना इथे कामावर असल्याचं मास्टरवर दाखवण्यात आलं आहे. पाच जणांनी कोरोनाची लागण झाली असताना या रस्त्यावर रोजगार हमीवर काम केल्याचं समोर आलं आहे. बरं हे कोरोनाबाधित रुग्ण होते का याची शहानिशा करायचं आम्ही ठरवलं आणि सुरुवातीला पाचोड गावातील संगीता सुरेश बडजाते (वय वर्ष अवघे 60) यांना भेटायला गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांचं भलं मोठं ट्रेडिंग दुकान दिसलं. त्यात सिमेंट आणि लोखंडाची विक्री केले जात होती. तिथे त्यांचे पती सुरेश बडजाते दिसले. सुरेश बडजाते म्हणाले की, "साहेब कोरोना झाल्यावर कोणी कामावर जाऊ शकता का?" बडजाते कुटुंबीय करदाते आहेत. सुरेखा 9 एप्रिलला कोरोना पॉझिटिव आढळल्या होत्या. मात्र त्याच दरम्यान म्हणजेच 9 एप्रिल ते 15 एप्रिल आणि 16 एप्रिल ते 22 एप्रिल त्या रोजगार हमीच्या कामावर होत्या आणि त्यांना 2940 रुपये दिल्याचंही कागदपत्र सांगतात.
पुढे आम्ही आणखी एका कुटुंबाला जाऊन भेटलो, ज्यांचं नाव होतं सुरेश अशोक नरवडे आणि शिवकन्या सुरेश नरवडे. सुरेश नरवडे आणि शिवकन्या नरोडे यांचा शेत आहे. सुरेश यांच्या नावावर चार एकर, पत्नीच्या नावावर चार एकर आणि आईच्या नावावर साडेतीन एकर शेती आहे. तरीही कोरोना पॉझिटिव्ह असताना हे जोडपं रोजगार हमीच्या कामावर होते. सुरेश आणि शिवकन्या दोघेही 23 एप्रिलला कोरोना पॉझिटिव आढळले होते, मात्र ते 15 एप्रिल ते 21 एप्रिल आणि 22 एप्रिल ते 28 एप्रिल रोजगार हमीच्या कामावर काम करत होते.
याप्रमाणेच यश भुमरे आणि विनोद नरवडे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असताना रोजगार हमीच्या कामावर होते. त्यांच्या नावानेही पैसे दिले आहेत. याचे सगळे पुरावे एबीपी माझाकडे आहेत.
रोजगार हमी योजनेचे काम मिळवायचे असेल तर काय नियम आहेत यावर एक नजर टाकूया.
- मजुराने स्वतः काम मागणी पत्र द्यावे लागते. तेव्हा त्याला रोजगार हमीतून रोजगार दिला जातो. पण या ठिकाणी कुठलीही मागणी नसताना खोटे मास्टर भरण्यात आले
- रोजगार हमी काम करत असताना महिन्याच्या पहिल्या शनिवारी ग्राम रोजगार दिवसाचे आयोजन करावे लागते ते करण्यात आले नाही.
- मजुराला त्याची वेतन चिठ्ठी (pay slip) द्यावी लागते त्याचंही कुठे पालन केले नाही.
- काम आधी करण्यात आले आणि नंतर सध्या बोगस मास्टर भरण्याचे काम सुरु आहे.
- रोजगार हमीचे काम ग्रामपंचायत हद्दीतच करता येतात. साजेगाव रस्ता हा अंबड हद्दीत करण्यात आला आहे.
पाचोड गावातीलच शिवाजी भुमरे यांना आणि त्यांच्या पत्नीला बँकेच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा एसएमएस आला. शिवाजी भुमरे म्हणतात, "मी ना कामावर आलो ना मी रोजगार हमीवर काम मागितलं. मला तसं काम करण्याची गरजही नाही. पण हे असं कसं झालं याची माहिती मला नाही."
रोहियो मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी : इम्तियाज जलील
केवळ कोविड रुग्णाच्याच नावे नाही तर ज्यांच्या नावे पैसे उचलले आहेत, त्यातले बरेच जण गर्भश्रीमंत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन मुख्यमंत्र्यांमध्ये जरा देखील जाण असेल तर त्यांनी मंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज अली यांनी केली आहे.
सखोल चौकशी करण्याची मागणी
एकीकडे कोरोना काळात काम नाही म्हणून कामगार वणवण फिरत आहेत. त्यातच खुद्द मंत्र्याच्या गावांमध्ये जिथे मंत्र्यांचा नातेवाईक सरपंच, मुलगा जिल्हा परिषद सदस्य आहेत तिथे रोजगार हमी योजनेची ही अशी दशा आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करणार का? दोषींवर मग ते मंत्री जरी असतील तरी त्यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार का हे जनता पाहणार आहे.
रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, अशी म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे. पण खुद्द रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या गावातच कोविड रुग्णांना रोहयोच्या कामावर दाखवून पैसे उचलले जात असतील तर रोजगार हमी आणि सगळंच आम्ही असंच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांची देखील प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. भुमरे म्हणतात की, "कोविडची लागण झाली असताना एखादा व्यक्ती रोजगार हमीवर काम करु शकतो हे मलाही मान्य नाही. ही अनियमितता कशी झाली याची आम्ही चौकशी करु." पण ज्या गावात त्यांचा पुतण्या सरपंच आहे. मुलगा के सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि ते स्वतः रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री आहेत, तिथे एखादा अधिकारी असं करण्याचं धाडस करु शकतो का? हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडे मात्र त्याचं काहीही उत्तर नव्हतं. त्यामुळे समझनेवालों को इशारा काफी है...