रत्नागिरी जिल्ह्याचा प्रवास 'लॉकडाऊन'च्या दिशेनं; शिमगोत्सवावर देखील आता कोरोनाचं सावट!
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्यापासून प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अशातच रत्नागिरीचा प्रवास लॉकडाऊनच्या दिशेने होत असल्याचं बोललं जात आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर आता शासकिय यंत्रणा तातडीनं कामाला लागली आहे. दुबईहून आलेल्या गुहागरमधील रूग्णाचे रिपोर्ट हे पॉझिटीव्ह आले आहेत. त्यानंतर आता खबरदारीचे सर्व उपाय घेतले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे देखील हजर होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आता जिल्ह्यातील हॉटेल, बार आणि टपऱ्या या बंद करण्यात येणार आहेत. तर, जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सोडून सर्व दुकानं ही बंद केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याची माहिती दिली आहे. तर, ग्रामीण वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली लाल परी अर्थात एसटी देखील पुढील 5 दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानं बंद केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली. दरम्यान, परदेशातून आलेल्या व्यक्तींनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यास संपुर्ण कुटुंबावर गुन्हे दाखल करणार असल्याचं देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्हा लॉकडाऊनच्या दिशेनं जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण सापडला असला तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. केवळ खबरदारी म्हणून हे सारं उपाय केले जात आहेत. लोकांनी घाबरू नये. शिवाय, शासकीय माहिती व्यतिरिक्त अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.
पाहा व्हिडीओ : Coronavirus | कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी सरसावली, गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना | ABP Majha
धार्मिक कार्यक्रमांवर बंदी
कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शिमगोत्सवातील शिंपणे हा उत्सव मोठा असतो. गावांगावंमध्ये तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, आता धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे. त्यामुळे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आरोग्य यंत्रणा सक्षम
सध्याची परिस्थिती हाताळण्यास आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. त्याबाबत सर्व तयारी करण्यात आली आहे. तसंच खासगी रूग्णालयाची देखील मदत याकामी घेतली जात आहे. त्याबाबतची कल्पना त्यांना देण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क देखील साधला गेला आहे, अशी माहिती देखील यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
देवस्थानं बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आता जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानं देखील बंद करण्यात आली आहेत. गपणपतीपुळे आणि पावस ही देवस्थानं पुढील आदेश येईपर्यंत बंद असतील. पण, सध्या कोरोनाचा फटका हा आता पर्यटन व्यवसायाला देखील बसला आहे. छोट्या- मोठ्या व्यवसायिकांकडून सध्या याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पण, नाराजीचा सूर मात्र कुठंही दिसून येत नाही आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | इटलीमध्ये एका दिवसात 475 जणांचा मृत्यू; जगभरातील परिस्थिती गंभीर
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 175, देशात एका दिवसात 20 रुग्णांची नोंदCoronavirus | ममता बॅनर्जी यांच्या अधिकाऱ्याचा मुलगा कोरोनाबाधित; तीन दिवस अनेकांच्या भेटीगाठी