Covid-19 | ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोनाबाधित; मंत्री महोदयांवर तातडीने उपचार सुरु
ठाकरे सरकारमधील आणखी एक वरिष्ठ मंत्री कोरोना बाधित झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. यापूर्वी ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भवा पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशातच आता ठाकरे सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच संबंधित नेत्याला लवकरच उपचारासाठी मुंबईत आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जाणार आहे. अद्याप यासंदर्भात शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे आव्हाड यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. परंतु, ही चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर केवळ थकवा जाणवत असल्यामुळे आव्हाड घरीच आराम करत होते. पण काही दिवसांनी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून उपचारानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वांद्र्यातील निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याजवळील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले अनेक सुरक्षा रक्षक या चहावाल्याकडे चहा पिण्यासाठी जात असतं. त्यामुळे चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच शंभरहून अधिक सुरक्षा रक्षकांना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. तसेच मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली होती.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 50 हजार पार
राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार पोहोचला आहे. तर आज एकाच दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहेत. राज्यात काल 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्याचा कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.
दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 1635 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार पार, आज दिवसभरात 3041 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रासाठीची 125 रेल्वेची यादी कुठे आहे? रेल्वेमंत्र्यांचे रात्री 12 आणि 2 वाजता ट्वीट