Coronavirus | कोरोना संदर्भात एसटी प्रशासन जागरूक; प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वच्छता राखण्याचं आवाहन
श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधतांना संसर्ग होणार नाही याविषयी काळजी घ्यावी. वेळोवेळी, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. नाक, डोळे यांना वारंवार स्पर्श करू नये, शिकतांना, खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे. अशा सुचना प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
धुळे : कोरोना विषाणूंचा फैलाव टाळण्यासाठी एसटी प्रशासनानं राज्यातील सर्व बस स्थानकं तेथील प्रसाधन गृहं हे जंतनाशकांचा वापर करून स्वच्छ ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत . बसस्थानक हेदेखील गर्दीचं ठिकाण असल्यामुळे अशा ठिकाणी संसर्ग फैलावणार नाही याबाबत ही दक्षता घेण्याचे आवाहन करत एसटी प्रशासनानं काही सूचना देखील केल्या आहेत .
संपूर्ण जगात कोरोनाच्या दहशतीनं नागरिकांची झोप उडाली आहे. कोरोना संदर्भात महाराष्ट्रात सध्या तरी रुग्ण आढळला नसल्याचं सांगण्यात येत असलं तरी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीनं विविध माध्यमातून करण्यात येत आहे. एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एसटीचे चालक वाहक हे एसटी महामंडळ आणि प्रवासी यांच्या मधील थेट संपर्क असणारा महत्वाचा दुवा आहे. वाहकाचा तर थेट प्रवाशांशी संपर्क येत असतो. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने वाहक आणि प्रवासी दोघांनी काळजी घेण्याविषयीचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात एसटी प्रशासनाने देखील आपल्या कर्मचारी आणि प्रवासी वर्गाच्या आरोग्याच्या, सुरक्षेच्या दृष्टीने स्वच्छतेच्या बाबतीत बस स्थानकं नियमित स्वच्छ ठेवण्याचे तसेच बस स्थानकातील प्रसाधन गृहं हे नियमित जंतनाशकांचा वापर करून स्वच्छ ठेवण्याचे आदेश 7 मार्च 2020 च्या एका पत्रकान्वये जारी केले आहेत. एसटीच्या सर्व वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयं यांना सुचना दिल्या आहेत .
पाहा व्हिडीओ : कोरोनामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ, प्रतितोळा 44 हजार 380
श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधतांना संसर्ग होणार नाही याविषयी काळजी घ्यावी. वेळोवेळी, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. नाक, डोळे यांना वारंवार स्पर्श करू नये, शिकतांना, खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे. अर्धवट शिजलेले/कच्चे अन्न खाऊ नये. फळे, भाज्या न धुता खाऊ नये. जंगली, पाळीव प्राणी यांच्याशी निकटचा संबंध टाळावा. अशा काही सूचना एसटी प्रशासनाने कर्मचारी, प्रवासी अशा दोघांसाठी जारी केल्या आहेत. बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवासांना, वाहकांना या संदर्भात सूचना देऊन अवगत करावे जेणेकरून कोरोना विषाणूंचा प्रसार होणार नाही.
संबंधित बातम्या :
ब्रिटनचा कोरोना संशयित पर्यटक गोमेकॉत दाखल
Coronavirus | देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद
Coronavirus | इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा हाहाकार, एका दिवसात 49 लोकांचा मृत्यू