दिल्लीतील निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील अनेकांचा सहभाग, सर्वांचा शोध सुरु
दिल्लीतल्या निजामुद्दीन दर्ग्यात झालेल्या एका धार्मिक महाराष्ट्राच्या विविध भागातील अनेक जणांनी उपस्थिती लावल्याचं समोर आलं आहे. देशभरातून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातून या कार्यक्रमाला उपस्थित असेलेल्या प्रत्येकाचा शोध सुरु करण्यात आला आहे.
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीन दर्ग्यात झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं कोरोनाबद्दल आपण किती बेफिकीर आहोत हे समोर येत आहे. निजामुद्दीन दर्गा दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनलाय आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
औरंगाबाद
दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन येथील मरकझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 47 जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत. औरंगाबादेत आतापर्यंत 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी गांधीनगर भागातील सात जणांना क्रांती चौक पोलिसांनी घाटी रुग्णालयात भरती केले. अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या सातपैकी सहाजण लग्नाला गेले होते, असं पोलिसांनी सांगितले. दरम्यान या मरकझमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने तेथे सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान 136 व्यक्ती आहेत, जे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना क्वॉरंटाईन करणं सुरू झालं आहे. आज रात्रभरात या सर्वांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये आणि पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात एकत्र करण्यात येईल. उद्या या सर्वांचे स्वॅब टेस्ट करण्यासाठी पाठवले जातील.
सोलापूर
निजामुद्दीन येथील मरकजला सोलापूर जिल्ह्यातील 16 जण उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यातील 16 जणांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यामध्ये शहरी भागातील 6 तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे. या 16 जणांच्या संपर्कात असलेल्या लोकांचा शोध प्रशासनाने सुरु केला आहे. मरकजला उपस्थित राहून गावात परतल्यानंतर यांनी प्रशासनाला माहिती कळवली नाही.
चंद्रपूर
चंद्रपूरच्या राजुरा शहरातही एक संशयित रुग्ण आढळला. निजामुद्दीनमधील कार्यक्रमातून हा व्यक्ती परतला आहे. सदर व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याचे स्वॅब तपासणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
लातूर
दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश होता. नांदेड पोलिसांना दिल्ली पोलिसांनी मोबाईल नंबर दिले असून 13 पैकी 1 पोलिसांना सापडला असून इतर 12 जनांचा शोध सुरू आहे.
अकोला
निजामुद्दीन येथील मरकजला उपस्थित असलेल्या 10 जणांचा शोध लागला आहे. अकोल्यातील 4, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यातील प्रत्येकी 3 जणांचा यामध्ये समावेश आहे. चार जणांशी संपर्क झाला असून बार्शिटाकळीतील दोन जण गायब आहेत. तर काहीजण अद्यापही दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहे.
परभणी
परभणीत दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील जमातमध्ये गेलेले 3 जण परतले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.