Coronavirus : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, डहाणू मतदार संघाचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन
1980 मध्ये ते प्रथम डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते 1984, 1989, 1991 व 2004 असे पाच वेळा निवडून आले.
पालघर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व डहाणू मतदार संघाचे माजी खासदार,गांधी घराण्याचे निकटवर्ती दामोदर बारकू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. वसई येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान आज (रविवार) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.
दामोदर बारकू शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.ते ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष होते. दामोदर शिंगडा हे पहिल्यांदा लहान वयात खासदार झाले त्या वेळे पासून आजतागायत गांधी घराण्यासी एकनिष्ठ होते.स्वर्गीय इंदिरा गांधी त्यांना बेबी एमपी म्हणूनच संबोधित करायच्या.
सन 1980 मध्ये ते प्रथम डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते 1984, 1989, 1991 व 2004 असे पाच वेळा निवडून आले.भारतीय कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या दामोदर शिंगडा यांनी 1979 मध्ये प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली.1980 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी ते खासदार म्हणून निवडून आले. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.शेतीनिष्ठ शेतकरी म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे कॉंग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना अजात शत्रु म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.