Coronavirus | जळगावात कोरोना विषाणूचं थैमान, 24 तासात 13 जणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जळगाव : जळगावात कोरोना विषाणूमुळे मृत्यूतांडव सुरु आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर नव्या 24 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जळगावात कोरोनाबाधितांची संख्या 762 वर पोहोचली आहे.
जळगावात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोना बळींची संख्याही वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंतच्या जळगावातील बळींची संख्या 94 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण जळगाव, भुसावळ आणि अमळनेर तालुक्यातील आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू भुसावळमध्ये झाले आहेत. भुसावळ तालुक्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जळगावात 15 तर अमळनेरमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज नोंद झालेल्या 24 रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 5, जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 4, भडगाव 5, रावेर 2, तर अमळनेर, यावल, जामनेर याठिकाणच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 762 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढू लागलं आहे. आतापर्यंत 316 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात सध्या 352 अॅक्टिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता निम्म्यावर आल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
राज्यासह देशभरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण साडेतीन टक्के इतके आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण हे सुरुवातीपासूनच वाढीव होते. गेल्या काही दिवसांपूर्वी हे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत होते. मात्र यामध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत असून, सद्यःस्थितीत मृत्यूचे प्रमाण हे 12 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने मृत्यू रोखण्यासाठी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे.