LIVE UPDATES | शार्जील उस्मानीविरुद्ध पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Budget 2021: आज सादर होणार अर्थसंकल्प, कोरोना काळात कशा पूर्ण होणार जनतेच्या अपेक्षा?
Union Budget 2021 अर्थात केंद्रीय अर्थसंकल्पाचीच चर्चा 2021 हे वर्ष सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. 29 जानेवारीपासून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. ज्यानंतर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बहुप्रतिक्षित असा यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या संकटातूनही तरुन जात भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2021 म्हणजेच यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यापैकी पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात पार पडणार आहे. याचदरम्यान, निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री म्हणून, देशाचा आर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करतील.
देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर या काळात नजर असेल ती म्हणजे Personal Data Protection Bill बाबतची. याचसाठीचा अहवाल सादर करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती. अर्थसंकल्प सादर होतेवेळी आणखी एका मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रंगताना दिसणार आहे. हा मुद्दा म्हणजे दिल्लीच्या सीमेवर सुरु असणारं शेतकरी आंदोलन. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पेटलेलं हे आंदोलन आणि धुमसणारा असंतोष हे मुद्दे अधओरेखित करत विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे.
Budget 2021: मोफत कोरोना लसीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी
कोरोनाची लस मोफत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान उद्याच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान मोफत लसीसाठीची तयारी केंद्रात सुरू असून या संदर्भात उद्या बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकारचाच असतो. देशस्तरावर केंद्र सरकारने राबवायचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभर मोफत लसीकरण करावं हे अपेक्षितच आहे आणि ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. उद्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, यामध्ये मोफत लसीकरणाची तरतूद जरुर करावी. ज्या ज्या लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे, त्यांचं लसीकरण करण्याची तरतून केंद्र सरकारने करावी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.