(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्यांची आता कोरोना चाचणी बंधनकारक; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या या ठिकाणी अँटीजेन चाचणी केल्यानंतर, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पुढं सोडलं जाईल. यावेळी जर का कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर मात्र संबंधित व्यक्तिला रूग्णालयात किंवा उपचारासाठी दाखल केले जाईल.
रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. राज्यात रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानंतर आता रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं देखील संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे. अयोग्य कारणांसाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तिवर पोलिसांची नजर असणार असून महत्त्वाच्या ठिकाणी आणि नाक्या-नाक्यावर पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे. तर, जीवनावश्यक वस्तू या नागरिकांना घरोघरी पोहोचवल्या जाणार असून त्याकरता हेल्पिंग हँड सारखी संस्था किंवा काही सामाजिक संस्था आणि नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडण्यासाठी योग्य कारण द्यावं लागणार आहे. या साऱ्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी केली जाणार आहे. रेल्वे किंवा बसने येणाऱ्या प्रवाशांची देखील कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल निगेटिव्ह असल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला पुढं सोडलं जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामध्ये आणखी भर पडू नये याकरता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
कुठं आणि कधी होणार कोरोना चाचणी?
रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेशासाठी मुंबई - गोवा महार्गावरील कशेडी, रायगडमधून प्रवेश केल्यानंतर मंडणगड येथे आंबेत आणि आंबा घाटातून खाली उतरल्यानंतर मोर्शी या ठिकाणाहून येता येते. सध्या याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रवेश केला जातो. त्यामुळे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या या ठिकाणी अँटीजेन चाचणी केल्यानंतर, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पुढं सोडलं जाईल. यावेळी जर का कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर मात्र संबंधित व्यक्तिला रूग्णालयात किंवा उपचारासाठी दाखल केले जाईल. शिवाय, जिल्ह्यातील इतर पण जास्त चर्चेत नसलेल्या काही प्रवेशद्वारांवर देखील पोलिसांची नजर असणार आहे. रेल्वे किंवा एसटी, खासगी बसनं येणाऱ्या प्रत्येकाची देखील यावेळी कोरोना चाचणी केली जाणार असून या ठिकाणी देखील आरोग्य विभागाची टीम कार्यरत असणार आहे.
Corona Vaccination | आता घरोघरी जाऊन लसीकरणाची तयारी? अनेक कंपन्यांचा केंद्र सरकारला प्रस्ताव
का घेतला निर्णय?
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील तीन दिवसांचा विचार करता किमान हजार नव्या रूग्णांची भर पडली आहे. जिल्ह्याच्या तिन्ही एन्ट्री पॉईंटच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही, त्याठिकाणी उपलब्ध असलेला तपशील पाहता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या साऱ्यांच्या कोरोना अहवालाबाबत किंवा त्यांच्यामधील लक्षणांबाबत कुणालाही माहिती नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. परिणामी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे याच उद्देशानं हा निर्णय घेतला असून नागरिकांना घाबरू नये किंवा कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
Coronavirus | आळशी लोकांना कोरोनाचा धोका अधिक, संशोधनातून माहिती उघड
'जीवनावश्यक वस्तुंची चणचण भासणार नाही'
जिल्ह्यात संचारबंदी किंवा कडक लॉकडाऊन असला तरी जीवनावश्यक वस्तु किंवा अत्यावश्यक सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्याबाबत सारी खबरदारी घेण्यात आली आहे. यावेळी नागरिकांना कारण नसताना घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावी असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी वस्तु घरपोच देता येतील. तर, पर्याय नसलेल्या ठिकाणी सबंधित असलेली दुकानं सुरू राहतील. असं असलं तरी नागरिक आणि दुकानदार यांनी गर्दी होणार नाही. नियमांची पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर, गरज वाटल्यास कोरोना चाचणी करण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाची काय स्थिती?
नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागील 24 तासात 324 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 13,621 झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा चारशे पार गेला आहे.