अमरावतीत कोरोनाबाधित रुग्ण आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत शिरल्याने खळबळ
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनाबाधित रूग्ण पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी शिरला आणि एकच धांदल उडाली.
अमरावती : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनाबाधित रूग्ण पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी शिरला आणि एकच पत्रकारांमध्ये एकच धांदल उडाली. आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी अमरावतीत आले होते. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एक 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण हा चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत शिरला त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
अमरावती शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याने तो येथे आला असलाचे त्याने सांगितले. तर आपल्याला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटायचे असल्याचा तो आग्रह करत होता. त्यामुळे काही वेळ याठिकाणी तारांबळ उडाली होती. रुग्णाला दाखल करण्यासाठी प्रशासनाने खूप प्रयत्न केले पण तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी विनवणी करून तो हटत नाही. शेवटी पत्रकार परिषद संपल्यावर त्याला रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णालयात नेले.
युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडविला मंत्र्यांचा ताफा आरोग्यमंत्री राजेश टोपे अमरावतीच्या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी जात असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवला. अमरावतीमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता असताना राज्य सरकार गप्प आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा बारा हजाराच्या पार गेला आहे. कोरोनाबाधितांना अवाढव्य बिल दिली जात आहेत. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अमरावतीमध्ये अनेक रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत मात्र राज्य सरकार गप्प असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.