का कोरोना वाढणार नाही? बुलडाण्यात जेवण तसेच दारु पिण्यासाठी रुग्णांचे कोविड सेंटरमधून पलायन
बुलडाण्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. जिल्ह्यात सातत्याने रोज 600 च्या वर कोरोना रुग्ण वाढत असताना कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमधून पळून जाऊन जवळच्या हॉटेलात किंवा ढाब्यावर जेवण व मद्यप्राशन करून परत रात्री कोविड सेंटरमध्ये दाखल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे..
बुलडाणा : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. त्यात काही नागरिक मात्र अजूनही गंभीर नसल्याचं चित्र आहे. बुलडाण्यात तर एक भयंकर घटना समोर आली आहे. जिल्ह्यात सातत्याने रोज 600 च्या वर कोरोना रुग्ण वाढत असताना कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमधून पळून जाऊन जवळच्या हॉटेलात किंवा ढाब्यावर जेवण व मद्यप्राशन करून परत रात्री कोविड सेंटरमध्ये दाखल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे..
राष्ट्रीय महामार्गावरील एका धाब्यावर मनसोक्त मद्यप्राशन करून परत कोविड सेंटरच्या दिशेने जात असताना नांदुरा येथील एक 55 वर्षीय रुग्ण अति मद्यप्राशन केल्याने महामार्गावर मध्यभागी पडलेला दिसला. यावेळी काही समाजसेवकांनी त्याला उचलून सामान्य रुग्णालयात भर्ती केले. भर्ती केल्यानंतर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिल्यावर कळले की हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून गेल्या तीन दिवसांपासून घाटपुरी कोविड सेंटर येथे भरती करण्यात आलेला आहे. खामगाव येथील घाटपुरी कोविड सेंटर मधून असेच काही कोरोना रुग्ण दाखल असताना रात्री पळून गेले आहेत.
जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाच्या अशा निष्काळजीपणामुळे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत नसल्याचं बोलले जात आहे. सदर कोविड सेंटर हे महामार्गालगत आहे. रुग्णांना चांगलं जेवण मिळत नसल्याने असे प्रकार नित्याचेच असल्याचं जवळ असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी सांगत आहेत.
Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! सरकारसमोर मोठं आव्हान
राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक
राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पहायला मिळत आहे. काल राज्यात तब्बल 25,833 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेडचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 12,174 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 21,75,565 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.79% एवढे झाले आहे. राज्यात आज 58 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.22% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,79,56,830 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 23,96,340 (13.35 टक्के) नमुने पॉजिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,66,353 अॅक्टीव रुग्ण आहेत.