कोरोनाचा अहवाल प्रलंबित असताना मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, रुग्णालयाविरोधात पोलिसात गुन्हा
सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एक महिलेस श्वसनाचा त्रास होत असल्याने यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनाचा संशय असल्याने डॉक्टरांनी स्वॅब देखील तपासणीसाठी पाठवले.
![कोरोनाचा अहवाल प्रलंबित असताना मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, रुग्णालयाविरोधात पोलिसात गुन्हा coroanavirus solapur The body was handed over to relatives while the report was pending कोरोनाचा अहवाल प्रलंबित असताना मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, रुग्णालयाविरोधात पोलिसात गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/03052824/yashodhan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : कोरोनाची चाचणी झालेल्या एका महिला रुग्णाचा मृतदेह अहवाल येण्यापूर्वीच दिल्याने सोलापुरातील यशोधरा हॉस्पीटल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातल्या कर्णिक नगर परिसरातील एका महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोना सदृश लक्षणे आढळल्याने या महिलेची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. उपचार सुरु असताना या महिलेचा मृत्यू झाला मात्र कोरोनाचे अहवाल प्रलंबित असताना देखील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या महिलेचे चाचणी ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सोलापुरात प्रसिद्ध असलेल्या या रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एक महिलेस श्वसनाचा त्रास होत असल्याने यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनाचा संशय असल्याने डॉक्टरांनी स्वॅब देखील तपासणीसाठी पाठवले. मात्र उपचार सुरु असताना 26 मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला. अहवाल प्रलंबित असताना देखील हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यामुळे 27 मे ला मृत महिलेवर नातेवाईंकाच्या उपस्थितीत अंत्य संस्कार करण्यात आले. मात्र 28 मे रोजी या मृत महिलेचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनाच धक्का बसला.
वास्तविकता शासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्य संस्कार करण्याबाबत वेळोवेळी सुचना आणि आदेश दिले आहेत. कोणत्याही रुग्णाचे अहवाल प्रलंबित असताना मृतदेह ताब्यात देता येत नाही. मात्र असे असातना देखील यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यामुळे शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करत संसर्गजन्य रोग पसरविण्यासाठी तसेच सामाजिक सुरक्षा धोक्यात आणल्या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासना विरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर विठ्ठल सोड यांनी हॉस्पीटल प्रशासन विरोधात फिर्याद दिली आहे. भादंवि 188, 269, 336 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदाच्या कलननुसार जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक जे. एन. मोगल यांनी दिली. दरम्यान या मृत रुग्णाच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असणाऱ्या 19 नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांचे देखील स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)