एक्स्प्लोर
वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक, कॉन्स्टेबलची आत्महत्या
उस्मानाबादः वरिष्ठांनी कामावर रुजू करण्याऐवजी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या नैराश्यातून एका पोलीस कॉन्स्टेबलने विषप्राशन करून आत्महत्त्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उस्मानाबादच्या पोलीस मुख्यालयातील ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे विषप्राशन करुन जमिनीवर कोसळल्यानंतर रात्रभर त्यांना कोणीही उचलण्याची तसदी घेतली नाही.
पहाटेच्या सुमारास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. चंद्रप्रकाश गंगाराम कलवले (वय 45) अस या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. ते उस्मानाबादच्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते.
चार दिवसांपुर्वी त्यांची पंढरपूर यात्रा बंदोबस्तासाठी तात्पुरती नेमणूक करण्यात आली होती, परंतु प्रकृती खराब असल्याचे कारण सांगून ते पंढरपूरला गेले नाहीत. त्यानंतर त्यांच्या जागेवर दुसरा पोलीस कॉन्स्टेबलही पाठवण्यात आला होता.
अपमानजनक वागणूक दिल्यामुळे आत्महत्या
चंद्रप्रकाश कालवले हे गुरूवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयात गेले. कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंढरपूरला का गेला नाहीस, म्हणून पाणउतारा केला आणि पुन्हा कामावर रुजू करुण घेण्यास नकार दिला.
त्यामुळे चंद्रप्रकाश कालवले यांनी मानसीक तणावाखाली येऊन पोलीस मुख्यालय परिसरातच गुन्हा अन्वेषण विभागाच्या ऑफीससमोर विषप्राशन केलं. विषप्राशन करुन जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यालयातील एकाही कर्मचाऱ्याने लक्ष दिलं नाही.
पहाटेच्या सुमारास त्यांना उस्मानाबादच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कालवले यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहे.
वरिष्ठांकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक
चंद्रप्रकाश कालवले हे नेहमीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घाबरत असत. कालवले यांना अधिकारी सतत अपमानास्पद वागणूक देत. ते रात्री खाकीमध्येच पोलीस मुख्यालयात गेले होते. त्यांच्या आत्महत्येमागे ड्युटी लावणारे अधिकारी जबाबदार असून त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कालवले यांच्या पत्नीने केली आहे.
कालवले हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या हाडोळी येथील रहिवासी आहेत. ते पंधरा वर्षांपासून उस्मानाबादच्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. या घटनेमुळे सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कालवले यांचा अपमान करणाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement