शरद पवारांना केंद्रात कृषीमंत्री आणि निती आयोगाच्या उपाध्यक्षपदाची ऑफर, अजित पवारांची भेट त्यासाठीच; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
Prithviraj Chavan : अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर शरद पवारही त्यांच्यासोबत येतील असा अंदाज भाजपचा होता, पण तसं घडलं नाही असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये पुण्यातील बैठकीवरुन सध्या राजकारण तापलं असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एक मोठा दावा केला आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) भाजपसोबत यावं, त्यांना केंद्रात कृषीमंत्रीपद (Union Agricultural Ministry) आणि निती आयोगाचे उपाध्यक्षपद (NITI Aayog Chairmanship) देण्यात येईल अशी ऑफर भाजपने त्यांना दिल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. पण शरद पवारांनी ही ऑफर नाकारली असल्याचंही ते म्हणाले. 'फ्री प्रेस जर्नल' या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये याबाबतचे वृत्त प्रसारित झालं आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे अजित पवार आणि शरद पवार यांच्या झालेल्या भेटीवर बोलताना म्हणाले की, अजित पवार भाजपसोबत सत्तेस सामील झाल्यानंतर शरद पवारही त्यांच्यासोबत येतील अशी शक्यता भाजपला वाटत होती. पण अजूनपर्यंत तरी तसं काही घडलं नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या सत्तेमध्ये सामील होण्यासाठी शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. केंद्रीत कृषीमंत्रीपद आणि निती आयोगाच्या उपाध्यक्षपदाची ऑफर त्यांना देण्यात आली आहे. अजित पवारांनी पुण्यात शरद पवारांची चोरडिया यांच्या निवासस्थानी घेतलेल्या या भेटीत या ऑफरबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. पण शरद पवारांनी भाजपची ही ऑफर नाकारली.
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनाही ऑफर
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवारांनी भाजपसोबत यावं यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनाही ऑफर देण्यात आली आहे. याबाबत अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आधीही शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं होतं. शरद पवार-अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संदिग्धता आहे. त्यामुळे ही संदिग्धता स्वतः शरद पवारांनी दूर करावी, या भेटीबद्दल त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माहिती द्यावी असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.
अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा फेटाळला
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीवर भाष्य केलं. शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांना भेटण्यात काय गैर आहे, असा सवाल अजित पवारांनी केला. इथून पुढंही आम्ही भेटत राहू, पण त्याचा राजकीय अर्थ काढू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. अतुल चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडताना गेटला धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच, असा पवित्रा अजित पवांरांनी घेतला. मी उजळ माथ्यानं फिरणारा कार्यकर्ता आहे. मी कुठंही लपून जात नाही असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रिपदाच्या ऑफरवरून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
ही बातमी वाचा: