(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत म्हणून वंचितच्या उमेदवारांना पळवले, प्रकाश आंबेडकरांची टीका
मंदिरं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आज प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारला शिर्डी, सिद्धीविनायकाचा पैसा चालतो. मग मंदिरं का चालत नाहीत? असा सवाल आंबेडकरांनी सरकारला केला आहे.
अमरावती : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांकडे 12 नावे मंजूरीसाठी पाठविली आहेत. यात काँग्रेसच्या कोट्यातून कलाकार आणि गायक अनिरूध्द वनकर आणि राष्ट्रवादीकडून प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांची नावे सुचविण्यात आली आहेत. हे दोन्ही नेते वंचित बहूजन आघाडीकडून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढले आहेत. प्रा. डॉ. यशपाल भिंगे वंचितकडून नांदेडमधून लोकसभा लढले होते. त्यांनी सव्वा लाखांच्या जवळपास मतं घेतल्यानेच नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता. तर गायक आणि कलाकार अनिरूध्द वनकर यांनी चंद्रपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघासाठी विधानसभा लढवली होती. या दोन्ही नेत्यांना थेट काँग्रेस-राष्ट्रवादीनं आपल्या गळाला लावल्यानं प्रकाश आंबेडकर काय बोलतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.