एक्स्प्लोर

महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेसाठी 'या' 12 जणांना संधी, जाणून घ्या त्यांच्याविषयी

महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना यांना देण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेसाठी 12 जणांना संधी देण्यात आली आहे. जाणून घ्या त्यांच्याविषयी...

मुंबई : महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना यांना देण्यात आला आहे. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढलेले यशपाल भिंगे यांचं नाव राष्ट्रवादीकडून देण्यात आलं आहे. यशपाल भिंगे यांच्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तर वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर विधानसभा लढलेले अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसने संधी दिली. कला क्षेत्रातील मोठी नावं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. तर गायक आनंद शिंदे यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे.

महाविकास आघाडीकडून देण्यात आलेली 12 नावे आणि त्यांचा परिचय

राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या एकनाथ खडसेंचा 'सन्मान' (समाजसेवा आणि सहकार)

एकनाथ खडसेंची ओळख किंवा परिचय करुन देण्याची खरंतर गरज नाही. गेल्या काही दिवसांपासून ते फार चर्चेत होते. 40 वर्ष भाजपमध्ये काम करुन विविध पदांवर काम केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील महिन्यात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश करताना कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रवेश केला असल्याचं सांगणाऱ्या खडसे यांचं नाव राष्ट्रवादीनं राज्यपाल नामनियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी देत त्यांचा 'सन्मान' केला असल्याचं बोललं जात आहे. जळगावातल्या कोथळीत जन्मलेल्या खडसे यांनी सरपंचपदापासून ते विरोधी पक्षनेते आणि महत्वाच्या मंत्रिपदावर काम केलं आहे. ते मुक्ताईनगरमधून आमदार होते. 2009 पासून ते 2014 पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधीपक्ष नेता होते. 1995 -1999 या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. 2014 मध्ये खडसे यांच्याकडे महसूल, कृषीसह पशुसंवर्धन ,दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क मंत्री, अल्पसंख्याक मंत्री अशी जबाबदारी देण्यात आली. मात्र नंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळं त्यांनी राजीनामा दिला. फडणवीस यांच्याशी पक्षांतर्गत संघर्षामुळं त्यांनी मागील महिन्यात भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख असलेले राजू शेट्टी (समाजसेवा आणि सहकार) राज्यपाल नामनियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव पाठवण्यात आलं आहे. 1967 साली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या ठिकाणी राजू शेट्टी यांचा जन्म झाला. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा विविध चळवळी, आंदोलने यामध्ये सहभाग होता. 1992 साली शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी चळवळीत सक्रिय झाले. शरद जोशी यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर 2005 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. उसाच्या दरासाठी राज्यभर आंदोलने करून शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळवून देण्याचं मोठं काम त्यांनी केलंय. जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास. 2002 साली पहिल्यांदा कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004 साली विधानसभा सदस्य म्हणून शिरोळ मतदार संघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं. त्यानंतर 2009 ते 2019 सलग दहा वर्षे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता शरद पवार यांनी त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी निश्चित केलं आणि पाठवलं.

लोककलेचा वारसा जपणारे आनंद शिंदे (कला) वडिलांकडून गाण्याचा वारसा मिळालेल्या आनंद शिंदे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या खंद्या आवाजाची जादू अखिल महाराष्ट्रावर केली. आपली गायनकला केवळ मनोरंजनासाठी न वापरता आंबेडकरी चळवळीचा प्रसार करण्यासाठी एक माध्यम म्हणून आपला आवाज कसा वापरता येईल याचा वसा आनंद यांनी घेतला. शेकलो लोकगीतं आणि त्याच बरोबरीने भीमगीतं गाऊन आनंद यांनी मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. 1980 च्या दशकांपासून हा वसा त्यांनी अखंड घेतला आहे. आपल्या नावावर अनेक विश्वविक्रम जमा करतानाच त्यांनी ही कला आपल्या मुलांमध्येही रुजवली. म्हणूनच आदर्श, उत्कर्ष आणि हर्षद ही तीनही मुलं आज शिंदे घराण्याचा हा वारसा पुढे नेताहेत. आंबेडकरी विचारांशी त्यांची असलेली नाळ आणि आवाजातला सच्चेपणा समान्य माणसाला कळल्यानेच त्यांच्या गाण्याला लोकमान्यता मिळाली. म्हणूनच लोकगीत गायन, चित्रपटगीत गाायन आदी सर्वच स्तरांवर आनंद यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या आमदारकीने आंबेडकरी चळवळीचा खंदा पाईक विधान परिषदेवर जाईल असा विश्वास अनेकांनी बोलूनही दाखवला आहे.

प्रबोधन आणि आंदोलनाच्या माध्यमातून पुढं आलेले प्रा.डॉ.यशपाल भिंगे (साहित्य)

मागील सतरा वर्षांपासून नांदेड येथील पीपल्स कॉलेजमध्ये पदव्युत्तर विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. यशपाल भिंगे यांचं नाव राष्टवादीकडून पाठवण्यात आलं आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभेत 2019 ला उमेदवार म्हणून तिसऱ्या क्रमांकाची एक लक्ष सहासष्ठ हजार एकशे शहान्नव(1,66,196) मते मिळवली होती. त्यांचे आजोबा  स्वातंत्र्यसैनिक कै.रंगनाथराव गंगारामजी भिंगे हे हैद्राबाद मुक्तिसंग्रामात दहा महिने तुरुंगात होते. डॉ.यशपाल भिंगे यांची बोंबलनामा, दलित रंगभूमी, प्रत्ययाप्रति, अभिव्यक्तीपर्व, धनगर आरक्षणःप्रश्न आणि उत्तरे अशी ग्रंथसंपदा  आहे. त्यांनी स्वा.रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचेही संपादन केले.ज्ञानविज्ञान संस्था पुणे यांच्या पुढाकारातून 2005 मध्ये महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांच्या शेकडो गावांतून डॉ.यशपाल भिंगे यांच्या जागतिकीकरण व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरील पथनाट्याचे सादरीकरण झाले. सन 2005 ते 2006 या वर्षभरात 'जागतिकीकरण आणि शेतीव्यवस्था' या विषयावरील भ्रमण व्याख्यानमाला जिल्ह्यातून चालवली.

महान बसवण्णा,छ.शिवाजी महाराज, पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर,म.फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे,संत गाडगेबाबा अशा महापुरुषांच्या चरित्रकार्यावर महाराष्ट्रात हजारो व्याख्याने दिली आहेत. यासाठी विविध संस्थांचे अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. आजवर प्राध्यापक म्हणून हजारो विद्यार्थी घडविले. प्रबोधन आणि आंदोलनाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्र पिंजून काढला.  त्याच्या रूपाने मराठवाड्यातील धनगर समाजाला राष्ट्रवादीकडून प्रतिनिधत्व देण्याचा प्रयास केला गेला आहे.  वंचित बहुजन आघाडीच्या पंढरपुर येथील पहिल्या मेळाव्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.  याच मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांच्याशी यशपाल भिंगे यांच्यात सुर जुळले. लोकसभेच्या निवडणुकीसाठी यशपाल भिंगे यांचे नाव सहा महीने अगोदरच घोषित करण्यात आले.  अशोक चव्हाणांचा या निवडणुकीत पराभव झाला त्यास यशपाल भिंगे कारणीभूत होते त्यांनी एक लाख 66 हजार घेतली होती. यामुळे भाजपचे प्रताप पाटिल चिखलिकर यांचा विजयचा मार्ग सुकर झाला.

काँग्रेस

महाराष्ट्र काँग्रेसचा 'आवाज' सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)

महाराष्ट्र काँग्रेसचा 'आवाज' अशी सचिन सावंत यांची ओळख. मुख्य प्रवक्ते म्हणून काँग्रेसची बाजू मांडणं असो की भाजपवर कुठल्याही विषयावर अभ्यासपूर्ण तुटून पडणे असो त्यात सचिन सावंत नेहमीच आघाडीवर असतात. वृत्तवाहिन्यांच्या चर्चांमधून त्यांनी नेहमीच काँग्रेसची बाजू अगदी ठळकपणे मांडली आहे. तसंच ते आपल्या सोशल मीडियातून देखील नेहमी अॅक्टिव्ह असतात. इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या 47 वर्षीय सचिन सावंतांना अखेर काँग्रेसकडून विधानपरिषदेत जायला संधी मिळाली आहे. सावंत यांनी  NSUI पासून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर युवा काँग्रेस नंतर मुंबई काँग्रेसचे सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी यांच्याबरोबर काम केलं आहे. अमेठी मतदारसंघात काँग्रेसतर्फे त्यांनी काम पाहिलं आहे. भाजप सरकार असताना शेतकरी कर्जमाफी,जलयुक्त शिवार अशा महत्वाच्या विषयांना वाचा सगळ्यात आधी सचिन सावंत यांनी फोडली.

मुझफ्फर हुसेन यांना काँग्रेसकडून अजून एकदा विधानपरिषदेची संधी (समाजसेवा) धर्मनिरपेक्षता, शिक्षण आणि विकास हे माझे मुख्य कर्तव्य आहेत.  लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळणे आणि राज्यात आदर मिळवणे आणि टिकविणे यासाठी मी काम करतो. मी गरीब आणि गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रिय आहे, असं म्हणत काम करणाऱ्या मुझफ्फर हुसेन यांना काँग्रेसनं संधी दिली आहे.  महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केलेल्या हुसेन यांना पुन्हा विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे.  1991 ला मीरा भाईंदर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मीरा भाईंदर महापालिकेचे उपमहापौर पदावर देखील त्यांनी काम केलं आहे. याआधी दोन वेळा विधान परिषदेत ही आमदार म्हणून राहिले आहेत. ते  माजी युवा काँग्रेस अध्यक्ष देखील आहे. व्यावसायिक असलेल्या हुसेन यांचं मीरा भाईंदर परिसरासह मुंबईत अनेक ठिकाणी चांगलं नेटवर्क आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे.

आंबेडकरी चळवळीतलं नाव अनिरुद्ध वनकर (कला) आंबेडकरी चळवळीतलं खासकरुन विदर्भातील एक चर्चित नाव अनिरुद्ध वनकर.  गोंडपिपरी तालुक्यात बोरगांव हे आंबेडकरी चळवळीचं गाव आहे आणि याच गावात एका गरीब कुटंबात अनिरूध्द वनकर यांचा जन्म झाला. गरीब आईवडील शेतमजूरी करून कसंबसं संसाराच रहाटगाडगं चालवायचे.  बोरगावच्या जिल्हा परिषद शाळेत अनिरूध्द यांचं आठवीपर्यत शिक्षण पार पडलं. आईवडील मरण पावल्यानंतर त्यांनी बल्लारपूर येथे बहिणीकडे राहून तो पुढील शिक्षण घेऊ लागला. बोरगाव बाबासाहेबाच्या क्रांतीने ओतप्रेत भरलेलं गाव आणि यातूनच अनिरूध्द गाणे गाऊ लागले नाटकात लहानसहान कामे करू लागलं. अशातच शासनाच्या कलापथकाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम त्यांना मिळू लागली. पुढे ते चंद्रपूरच्या बाबूपेठ मध्ये स्थिरावले. तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या सांस्कृतिक चळवळीला बळ मिळाले. "मी वादळवारा" या त्यांच्या भीमगीतांवरील कार्यक्रमाने महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवली. नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए. आणि एम.एफ.ए केलं आहे. मुंबई विद्यापीठातून "लोककला" आणि रामटेक संस्कृत विद्यापीठातून "नाट्यकलेचा" त्यांनी घेतला आहे. डिप्लोमा दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अनिरूध्दने उच्च शिक्षण घेतले. वनकर यांना काही मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सोबतच झाडीबोली रंगभूमीवर गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी नाटकांच्या माध्यमातून एकहाती राज्य गाजविले आहे. अनिरूध्दची नाटकं म्हणजे हाउसफुल्ल असं एक समीकरण तयार झालं होतं. तत्कालीन समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या माध्यमातून त्याला सामाजिक न्यायाच्या जनजागृतीची बरीच कामे केलीत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या "घायाळ पाखरा" या कार्यक्रमाला देखील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांना आतापर्यंत अण्णाभाऊ साठे पुरस्कार (1997), नेहरू युवा पुरस्कार (1998), लोकसूर्य पुरस्कार (2016), आंबेडकर रत्न पुरस्कार (2016) आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार (2016) मिळाला आहे.  बाबासाहेबांच्या चळवळीला आपल्या वाणीने पुढे नेणारा एक कलांवत अशी त्यांची ओळख आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून अनिरूध्द यांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून दोनदा निवडणूक लढवली व लक्षणीय मतं घेतली. 2014 साली चंद्रपूर विधानसभा त्यांनी लढवली यावेळी त्यांनी 14 हजारांच्यावर मतं घेतली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी 15 हजार मतं घेतली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यक्रमातून अनेकदा भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

गांधी निष्ठेमुळे रजनी पाटील यांना संधी (समाजसेवा आणि सहकार)

बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय नसलेल्या रजनी पाटील यांना कायम केंद्रामध्ये मात्र काँग्रेसकडून चांगले स्थान मिळाले. वाजपेयींच्या काळात रजनी पाटील या बीडमधून भाजपकडून खासदार झाल्या होत्या. मात्र सोनिया गांधींनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन सोनिया गांधी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. याच गांधी निष्ठेमुळे सोनिया गांधींनी रजनी पाटील यांना राज्य आणि देशपातळीवरची पदं देऊन सन्मान केला आहे. रजनी पाटील या बीडमधील केजच्या असल्या तरी त्यांचा वावर हा पुणे मुंबई आणि दिल्ली असाच राहिला आहे. रजनी पाटील काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या कायम निमंत्रित सदस्या असून हिमाचल काँग्रेसच्या प्रभारी आहेत.

रजनी पाटील यांचा जन्म 5 डिसेंबर 1958 ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाहे बोरगावला झाला. रजनी पाटील यांचे वडील क्रांतिवीर आत्माराम बापू पाटील हे स्वतंत्र सेनानी होते पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा चांगला दबदबा होता. शंकरराव चव्हाण यांच्या रजनी पाटील या मानसकन्या म्हणून ओळखल्या जातात. 1982 पासून त्या एन एस यु आय सोबत जोडल्या गेल्या. पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य होत्या. बीड जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य राहिल्या आहेत. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार म्हणून निवडून गेल्या. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षा, महाराष्ट्र खादी ग्राम मंडळाच्या जिल्हाध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरचे सचिवपद सांभाळले आहे. आता त्यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात संधी मिळाली आहे.

शिवसेना

चिंतनशील व अभ्यासू अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (कला) उर्मिला मातोंडकर हे नाव सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळलं ते 1983 मध्ये. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून. त्यानंतर रंगीला, सत्या, कौन, जंगल, मस्त, जुदाई, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून उर्मिला यांनी चतुरस्र अभिनेत्री अशी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कालांतराने उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण मार्च 2019 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याला कारणही तसं होतं. कॉंग्रेस पक्षाने त्यांना खासदारकीचं तिकीट देऊन रिंगणात उतरवलं. ती निवडणूक त्या हरल्या पण त्यांना मिळालेली मतं पाहता आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली. या निवडणुकीनंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना रनौतवरही आपल्या चिंतनशील व अभ्यासू वृत्तीने पलटवार केला. आता राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

प्राध्यापक, व्याख्याते ते आमदार, नितीन बानगुडेंचा प्रवास (साहित्य, सांस्कृतिक)

नितीन बानगुडे पाटील हे लेखक, वक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवव्याख्याते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. अमोल कोल्हे आणि नितीन बानगुडे पाटील या दोघांनी एकत्र शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी महाराष्ट्रातील गड दुर्ग संवर्धनासाठी कार्य केलं आहे. तसंच गड-किल्ल्यांचे मोल आणि महत्त्व सांगण्यासाठी प्रबोधन देखील त्यांनी केलंय.   महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्थळांच्या विकाससाठी कार्यरत असतात. स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या स्मृती जपणाऱ्या हुतात्मा स्मारकांच्या जतन व संवर्धनासाठी भरीव कार्य त्यांनी केलंय.  ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वयंउद्योगातून स्वयंपुर्णता कार्यशाळेचे आयोजन देखील ते करतात. गेल्या अठरा वर्षांपासून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर व्याख्याते व प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर ख्यातकीर्त व्याख्याते, लेखक व इतिहास अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत. ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक, आध्यात्म, विज्ञान, शिक्षण तसेच महापुरुषांची चरित्रे नानाविध विषयांवर सुमारे पाच हजाराच्या वर व्याख्याने त्यांनी दिलीत.  तरुण पिढीला मार्गदर्शन करणारी स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन, सामाजिक प्रश्न अशा असंख्य विषयांवर प्रेरणादायी व्याख्याने ते देतात. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती, संभाजी महाराज, मराठेशाहीचा इतिहास, तसेच स्वातंत्र्यलढ्याच्या जाज्वल्य इतिहासांचे व्याख्यानाच्या माध्यमाने उलगडून मांडण्याचे कार्य त्यांनी केलंय.2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी शिवसेना उपनेतेपदी निवड झाली आहे. तसंच सातारा सांगली जिल्हा संपर्क प्रमुखपदी त्यांची निवड झाली आहे. तसंच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्षपदी निवड (राज्य मंत्री पदाचा दर्जा) झाली आहे.

विजय करंजकरांना तिकिट देत उद्धव ठाकरेंनी शब्द खरा केला बालपणापासूनच हाडाचा शिवसैनिक अशी विजय करंजकरांची ओळख. शिवसेनेचा निष्ठावान आक्रमक चेहरा आणि नाशिकचे  शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख असलेल्या विजय करंजकरांना शिवसेनेनं संधी दिलीय. भगूर नगरपालिकेवर गेल्या 25 वर्षपासून शिवसेनेचा भगवा फडकविण्यात मोठं योगदान आहे. 2000 मध्ये भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी स्वतः जनतेतून निवडून आले. तसेच जिल्हा नियोजन मंडळावर 3 वेळा सदस्य तर नाशिक विकास प्राधिकरण 2 वेळा निवडून आले आहेत. भगूर शहराध्यक्ष, नाशिक उपजिल्हाप्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत त्यांची यशस्वी करकीर्द आहे. ते 2012 पासून आतापर्यंत जिल्हाप्रमुख जबाबदारी पार पाडत आहे. अयोध्येत शिवसेनेन शक्तिप्रदर्शन करत शरयूची महाआरती केली होती तेव्हा नाशिकहून ट्रेनभर शिवसैनिक घेऊन जाण्याची जबाबदारी करंजकर यांनी पार पडली. विजय करंजकर यांना आमदारकी देत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखविला. लोकसभा निवडणुकीसाठी विजय करंजकर इच्छुक होते, मात्र हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा करंजकर पक्षाचा आदेश आल्यानं शांत बसले. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत विजय करंजकर यांना जवळ बोलावत विजय मी तुला संधी देईल असा शब्द दिला होता तो शब्द आज खरा करून दाखवला.

कॉंग्रेसमधून राजीनामा देत शिवसेनेत आलेल्या चंद्रकांत रघुवंशींना संधी

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस सोडत आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेनेनं संधी दिलीय. विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ते शिवसेनेत आले. व्यवसाय, व्यापार, शेती अशा गोष्टींमध्ये रमणाऱ्या रघुवंशी यांची धुळे नंदुरबार जिल्ह्यात खास पकड आहे.धुळे नंदुरबार जिल्हा एकत्र असताना धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. तसंच ते धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे संचालक आहेत. काही काळ त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे आहे. ते तापी खोरे विकास महांडळाचे उपाध्यक्ष होते. दोन वेळा ते धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषद सदस्य झाले आहेत.   त्यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी नंदुरबार नगरपालिकेचे नगराध्यक्षा आहेत. तर मुलगा राम रघुवंशी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget